Police Station in Pakistan Shocking Incident Goes Viral: भारताचा शेजारी देश पाकिस्तान बऱ्याचंदा आपल्या विचित्र कारनाम्यांमुळे चर्चेत येतो. बऱ्याचंदा तिथले लोकं असं काही करतात की ज्यामुळे पाकिस्तानची खिल्ली उडवली जाते. सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, याचा नेम नाही. सध्या पाकिस्तानातील एक घटना सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जे वाचल्यानंतर तुम्हालाही हसू येईल.
पाकिस्तानात काहीही घडू शकते, हे सत्य सिद्ध करणारी ही घटना कराचीमधून समोर आली आहे आणि आता सोशल मीडियावर ती वेगाने व्हायरल होत आहे. जरा विचार करा, जिथे पोलिस ठाणे असेल तिथे कायदा आणि सुरक्षिततेची हमी असली पाहिजे. पण जेव्हा पोलिस ठाण्याच्या बाहेरच चोरी होते तेव्हा त्याला काय म्हणावे? कराचीतील अल-फलाह पोलिस ठाण्याबाहेर एका माणसाची बाईक चोरीला गेली. तेही जेव्हा तो पोलिस अधिकाऱ्याला भेटण्यासाठी आत गेला तेव्हा ही बाईकचोरीची घटना घडली.
जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, पाकिस्तानातील कराची शहरात वाढत्या रस्त्यावरील गुन्हेगारीची आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कराचीच्या कोरंगी जिल्ह्यातील अल-फलाह पोलिस ठाण्याच्या बाहेरून एका माणसाची मोटरसायकल चोरीला गेली, जेव्हा तो पोलिस ठाण्याच्या आत एका पोलिस अधिकाऱ्याला भेटण्यासाठी गेला होता.
पीडित शाहिद इक्बालने त्याची १२५ सीसी मोटरसायकल (नोंदणी क्रमांक KQT-6183) पोलिस ठाण्याच्या मुख्य गेटबाहेर पार्क केली आणि तो पोलिस ठाण्याच्या आत गेला. तो बाहेर परत आला तेव्हा त्याची बाईक गायब होती. या घटनेनंतर पोलिस ठाण्यात गोंधळ उडाला.
सीसीटीव्हीमध्ये दिसला चोर
सर्वांत धक्कादायक गोष्ट म्हणजे सीसीटीव्ही फुटेजमध्ये असे दिसून आले की, चोरीच्या काही मिनिटे आधी आरोपी तरुण पोलिस ठाण्यात घुसला होता. तो ड्युटी ऑफिसर आणि इतर पोलिसांना भेटला आणि हरवलेल्या ओळखपत्राबद्दल त्याने तक्रार करण्याचे नाटक केले. यादरम्यान, त्याला पोलिस ठाण्यातील वातावरण लक्षात आले. नंतर बाहेर येऊन त्याने बाईक चोरली आणि काही सेकंदांतच तो तिथून पळून गेला. पोलिसांनी आता सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीचा शोध सुरू केला आहे. आरोपी प्रथम पोलिस ठाण्यात गेला आणि नंतर हुशारीने दुचाकी घेऊन पळून गेल्याचे फुटेजमध्ये दिसून येते.
अल-फलाह पोलिस ठाण्याच्या बाहेर घडलेली ही चोरी केवळ कायदा आणि सुव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करीत नाही, तर गुन्हेगारांना आता पोलिसांची भीती राहिलेली नाही हेदेखील दर्शवते.