Mahakumbh 2025 Viral Video : प्रयागराजमध्ये १४४ वर्षांनंतर होत असलेल्या महाकुंभ मेळ्यात सहभागी होण्यासाठी भारतासह परदेशातून कोट्यवधी लोक येत आहेत. इतक्या मोठ्या संख्येने लोक एकत्र जमल्याने लोकांना ५०० मीटरचे अंतर कापण्यासाठी एका तासापेक्षा अधिक वेळ लागतोय. अशा परिस्थितीत गर्दीत अनेक लोक हरवत आहेत. कुटुंबापासून वेगळे होत आहेत. या लोकांच्या मदतीसाठी प्रशासनाने ठिकठिकाणी ‘खोया-पाया’ केंद्रे उभारली आहेत. या केंद्राच्या मदतीने हरवलेल्या लोकांना पुन्हा त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचवले जात आहे.
सध्या महाकुंभ मेळ्यातील अशा प्रकारच्या अनेक घटनांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतायत. त्यात नातेवाईक त्यांच्या हरवलेल्या लोकांना शोधण्यासाठी खूप प्रयत्न करतायत. त्यांना भेटण्यासाठी व्याकूळ होत आहेत. अशाच प्रकारच्या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यात महाकुंभ मेळ्यात सासू हरवल्याने सून रडून रडून हैराण झाल्याचे दिसतेय. सासूला शोधण्यासाठी तिने जीवाचा आटापिटा केला; पण सासू कुठेच न दिसल्याने ती घाबरून खूप रडतेय.
व्हिडीओमध्ये ती महिला बिहारमधील असल्याचा अंदाज बांधला जात आहे. व्हिडीओत ती रडत कॅमेऱ्यासमोर सांगतेय की, ती, तिची सासू आणि आणखी एक महिला महाकुंभ मेळ्यात सहभागी झाल्या होत्या; पण तिथे तिची सासू हरवली. पुढे ती सांगतेय की, आम्ही तिघी होतो; पण तिची सासू कुठे गेली हेच तिला समजत नाहीयेय. अद्याप ती सापडलेली नाही म्हणून तिने प्रशासनाकडे मदत मागितली आहे.
मोबाईलवर संपर्क होऊ शकत नाही
व्हिडीओमध्ये असे दिसून येते की, सासू हरवल्यामुळे ती महिला खूप अस्वस्थ आहे. रडवेली होऊन, ती सासूला शोधण्याचा प्रयत्न करत आहे. यावेळी तिच्याबरोबर असलेली एका महिलेने तिला सांगितले की, तुझ्या सासूकडे मोबाईल आहे; पण बॅटरी कमी असल्याने तो बंद आहे. त्यामुळे तुला तिच्याशी संपर्कही साधता येणार नाही. यावेळी इतर लोक सापडेल तुझी सासू, असे म्हणत त्या महिलेचे सांत्वन करताना दिसतायत.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहून लोक मात्र आश्चर्यचकित झाले आहेत. कारण- आजपर्यंत लोकांनी सासू-सुनेच्या भांडणाचे व्हिडीओ पाहिलेत; पण पहिल्यांदाच हरवलेल्या सासूला शोधण्यासाठी सून रडताना दिसतेय हे पाहून लोक चकित झाले आहेत. तर अनेक जण सुनेचे कौतुक करत आहेत.
एका युजरने या व्हिडीओवर कमेंट करत लिहिलेय की, ती जुन्या काळातील सून आहे. म्हणूनच तिचे सासूवर इतके प्रेम आहे. आजकालच्या रीलवाल्या मुलांना सासू नको; फक्त एकटा नवरा पाहिजे. दुसऱ्याने लिहिलेय, “बहुतेकदा, जर सासू चांगली असेल तर ती सुनेला मुलीसारखे वागवते आणि सून मुलीसारखीच राहते. माझी आई आणि माझी वहिनीही अशाच आहेत, त्यांना पाहून मलाही खूप आनंद होतो. माझ्या गावात असे फार दुर्मीळ आहे. माझ्या वहिनीचे मेंदूचे ऑपरेशन झाले होते तेव्हा माझी आई खूप रडली होती.
तिसऱ्याने लिहिले, “त्यांनी स्वतःला आधुनिकतेपासून दूर ठेवले आहे.” शेवटी एकाने लिहिलेय, “या महिलेचे रडणे हे सिद्ध करते की, या समाजात कुटुंब किती महत्त्वाचे आहे.”