बंगळुरुत अॅमेझॉनच्या पार्सल बॉक्समध्ये साप आढळल्याची घटना ताजी असताना आणि हर्षी चॉकलेटमध्ये मृत उंदीर तसंच आईस्क्रीममध्ये बोट आढळल्याचे प्रकार उघड झाले असताना आता अशीच एक बातमी गुजरातमधून समोर आली आहे. अहमदाबाद येथील प्रसिद्ध देवी रेस्तराँमध्ये सांबाराच्या वाटीत उंदीर आढळून आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुजरातमधल्या देवी रेस्तराँमधला प्रकार

अहमदाबाद येथील देवी डोसा रेस्तराँ हे प्रसिद्ध रेस्तराँ आहे. या ठिकाणी अनेक लोक आवडीने पदार्थ खायला येत असतात. याच हॉटेलमध्ये सांबारात मृत उंदीर आढळल्याने खळबळ उडाली आहे. या ठिकाणी ईडली, डोसा, उत्तपा तसंच इतर दाक्षिणात्य पदार्थ खायला मिळतात आणि लोकांची या ठिकाणी गर्दी होते. अहमदाबाद येथील निकोल भागात देवी डोसा सेंटर हे प्रसिद्ध रेस्तराँ आहे. या रेस्तराँमध्ये नाश्ता करण्यासाठी अनेकदा लोक येतात. इथल्या खास चवीमुळे हे रेस्तराँ प्रसिद्ध आहे असंही सांगितलं जातं. याच रेस्तराँमध्ये ही घटना घडली आहे.

हे पण वाचा- बापरे बाप! Amazon चं पार्सल उघडताच बाहेर आला साप, दाम्पत्याची घाबरगुंडी, कंपनीने दिलं ‘हे’ उत्तर

नेमकं काय घडलं?

देवी रेस्तराँमध्ये एका ग्राहकाने डोसा आणि ईडली मागवली. त्यातल्या सांबार वाटीत उंदीर आढळला. यानंतर या ग्राहकाने अहमदाबाद महापालिकेत धाव घेतली आहे. अन्न आणि औषध प्रशासनाकडे आणि आरोग्य विभागाकडे तक्रार केली आहे. त्यानंतर आरोग्य विभागाने या रेस्तराँला नोटीस बजावली आहे. या रेस्तराँची जेव्हा पाहणी केली तेव्हा सांबार आणि चटणीयांसारखे पदार्थ उघड्यावर ठेवल्याचंही दिसून आलं. या ठिकाणाहूनच ते लोकांना दिले जात होते असंही दिसतं आहे. त्यामुळे या ठिकाणी उंदीर पडला असण्याची शक्यता आहे असंही लोक व्हिडीओ पाहून म्हणत आहेत. अहमदाबाद अपडेट्स या इंस्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

भाविन जोशी यांनी काय सांगितलं?

अन्न सुरक्षा अधिकारी भाविन जोशी यांनी घडल्या प्रकाराबाबत ANI ला सांगितलं की , अहमदबाद महापालिकेने या प्रकरणी तातडीने लक्ष घातलं पाहिजे. तसंच अशा घटना टाळण्यासाठी आणि ग्राहकांना त्रास होऊ नये यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

व्हिडीओवर लोकांच्या प्रतिक्रिया काय?

ज्या ग्राहकाला हा अनुभव आला त्याने या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. सांबारात पडलेल्या या उंदराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. त्यावर लोक विविध कमेंटही करत आहेत. टेबलाखालून पैसे घेऊन असल्या हॉटेल्सना संमती देऊ नका आणि लोकांच्या जिवाशी खेळ करु नका असं काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.असल्या हॉटेल्समध्ये जाण्यापेक्षा महाग हॉटेल्समध्ये गेलं पाहिजे असाही सल्ला काहींनी दिला आहे. खाण्याचा दर्जा दिवसेंदिवस बिघडत चालला आहे असंही काहींनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dead rat found in sambar at popular ahmedabad restaurant video goes viral scj
Show comments