लोकांच्या सेल्फी वेडाला काही सीमा नसते. हे खुळ कधीतरी अंगाशी येतेच, या सेल्फीच्या नादात अनेकांना आपला जीव गमवाला लागतो असे कितीतरी उदाहरणं आहेत पण लोकांच्या डोक्यातून सेल्फीचे खुळ काही जात नाही. काही दिवसांपूर्वी इंडोनेशियामध्ये एक महिला पर्यटक मगरीसोबत सेल्फी काढत होती आणि नादात मगरीने तिच्यावर हल्ला केला होता असे कितीतरी किस्से असताना राजस्थानमधल्या जोधपूर येथे असाच धक्कादायक प्रकार घडला आहे. येथे पर्यटनासाठी आलेल्या एका पर्यटकाने गारूड्याकडून सेल्फी काढण्यासाठी विषारी साप घेतला आणि तो साप गळ्यात घालत असताना हा विषारी साप पर्यटकाच्या डोक्याला डसला आणि जागीच त्याचा मृत्यू झाला.
या परिसरात असणारे गारूडे येणा-या पर्यटकांच्या हातात मनोरंजनांसाठी हे विषारी साप देत होते. काही पर्यटक मौजेखातर या विषारी सापाशी खेळत होते. यातल्या एका पर्यटकाला या सापासोबत सेल्फी काढण्याचा मोह अनावर झाला. गारूड्याने या सापाला त्याच्या मानेभोवती ठेवण्याचा प्रयत्न केला या नादात साप पर्यटकाला डसला. क्षणात होत्याचे नव्हते झाले आणि काही वेळातच या पर्यटकाचा जागीच मृत्यू झाला. याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून सेल्फीसाठी या विषारी जीवाशी खेळ न करण्याचे आव्हान करण्यात येत आहे. काही महिन्यापूर्वी माऊंट अबुमध्येही असाच प्रकार घडला होता, जंगलात पडकलेल्या अजगराला पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. गर्दीतल्या एका तरूणाने पुढे येऊन त्याच्यासोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला होता या नादात अजगराने त्याच्यावर हल्ला केला होता.