अनेकदा आयुष्यात अशी वेळ येते जेव्हा माणसाला परिस्थितीच्या समोर झुकणे भाग असते. मनात नसतानाही संघर्ष करावा लागतो. प्रत्येकाच्या आयुष्यात त्यांच्या वडिलांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असते. परंतु ज्यांचे वडील नाहीत त्यांना आपल्या आयुष्यात अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागते. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही नक्कीच भावूक व्हाल. ही गोष्ट आहे १७ वर्षाच्या जशनदीप सिंग आणि त्याचा ११ वर्षाचा भाऊ अंशदीप याची. वडिलांच्या आकस्मिक मृत्यूनंतर या दोन भावांच्या खांद्यावर संपूर्ण घराची जबाबदारी येऊन ठेपली आहे.
एका व्हिडीओच्या माध्यमातून अमरजीत सिंग यांनी ट्विटरवर या दोन भावांची गोष्ट सांगितली आहे. या व्हिडीओमध्ये हे दोन भाऊ सँडविच आणि पिझ्झा बनवताना दिसत आहेत. तीन महिन्यांपूर्वीच जशनदीपच्या वडिलांनी हे रेस्टॉरंट सुरु केले आणि त्याच्या दोन महिन्यानंतर त्यांचे निधन झाले. जशनदीप सिंगने सांगितले की त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर तो आणि त्याचा भाऊ २६ डिसेंबर २०२१पासून हे रेस्टॉरंट सांभाळत आहेत. व्हिडीओमध्ये जशनदीप आपल्या समस्यांबद्दल बोलत आहे. त्यांचे बहुतेक पैसे सामान आणण्यासाठी खर्च होतात.
रेल्वे रुळांमध्ये दगड का टाकले जातात माहित आहे का? जाणून घ्या यामागची रंजक कारणे
असे असूनही जशनदीप याच्या मनात आशा आहे. जशनदीपने सांगितले की त्याचे वडील त्याला कधीही आशा सोडू नका असे शिकवायचे. तसेच आपल्या हक्काचे खावे असेही तो म्हणतो. व्हिडीओचे शेवटी हे दोन्ही भाऊ ग्राहकांना त्याच्या रेस्टॉरंटमध्ये येण्याचे आवाहन करत आहेत तसेच ग्राहकांना चविष्ट अन्न खाऊ घातले जाईल असे आश्वासनही ते देत आहेत. हे दोघे या रेस्टॉरंटपासून जवळपास २५ किलोमीटर लांब राहतात आणि रोज बाईकने आपल्या कामावर येतात. नेटकऱ्यांनी या दोन्ही भावांच्या मेहनती वृत्तीचे कौतुक केले आहे.