हरियाणातील पानिपत शहरातील एका दुर्घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे एका व्यक्तीचा काँक्रीटच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाल्याचं दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पानिपतमधील एका गल्लीतील मोडकळीस आलेले घर पाडण्याचे काम सुरु होते, यावेळी अचानक बाईकवरुन आलेल्या जोडप्याच्या अंगावर काँक्रीटचा ढिगारा पडला. या अपघातात पत्नी जखमी झाली, तर ढिगाऱ्याखाली दबलेल्या पतीचा पत्नीच्या डोळ्यांसमोर मृत्यू झाला आहे.

दिवाळीच्या खरेदीसाठी आले होते शहरात

अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव सुशील असं असून ते सुटाणा गावचे रहिवासी आहेत. गुरुवारी हे पती-पत्नी दिवाळीच्या खरेदीसाठी बाईकवरुन पानिपतला आले होते. यावेळी ते पाचरंगा मार्केटमधील हनुमान चौक येथील रस्त्यावरून जात असताना अचानक बाईकवर काँक्रीटचा ढिगारा पडला. या अपघातामध्ये पत्नीला किरकोळ दुखापत झाली, मात्र ढिगाऱ्याखाली दबलेल्या सुशील यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले.

हेही वाचा- जळत्या चितेतून उडू लागल्या नोटा; आग विझवण्यासाठी स्मशानभूमीत लोकांची धावपळ, संपूर्ण प्रकरण वाचून थक्कच व्हाल

अपघाताचा व्हिडीओ व्हायरल

रस्त्यावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा ही संपूर्ण घटना कैद झाली आहे. या घटनेचा भयानक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये सुशील आणि त्यांची पत्नी बाईकवरुन आल्याचे दिसत आहेत. यावेळी त्यांच्या बाईकवर काँक्रीटचा मोठा ढिगारा पडतो. हा ढिगारापडताच सर्वत्र धूळ उडाल्याचंही व्हिडीओथ दिसत आहे. शिवाय हा ढिगारा इतक्या जोरात पडतो की त्याचा आवाज ऐकून बाजारातील लोकं धावत घटनास्थळी येतात. जमलेलेल लोक सुशील यांच्या अंगावर पडलेला काँक्रीटचा ढिगारा हटवण्याता प्रयत्न केला मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

ठेकेदाराचा निष्काळजीपणा –

कोणतेही मोडकळीस आलेले घर पाडताना, ढिगाऱ्यामुळे इतरांना इजा होऊ नये यासाठी सुरक्षा जाळी बसवण्याचा नियम आहे. याशिवाय घटनास्थळी सूचना देणारा बोर्डदेखील लावण्यात येतात शिवाय रस्त्यावरुन लोकांनी ये-जा करु नये म्हणून काही बॅरीकेट्स लावले जातात. मात्र या कंत्राटदाराने संबंधिक घर पाडताना कोणतीही खबरदारी घेतली नव्हती. त्यामुळे कंत्राटदाराच्य निष्काळजीपणामुळेच हा अपघात झाल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. पानिपत पोलिसांनी सांगितलं, “अपघाताच्या कारणाचा शोध सुरू असून मृताच्या कुटुंबीयांकडून आलेल्या तक्रारीच्या आधारे चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल.”