आतापर्यंत सापाने सूड उगवला उशा प्रकराच्या काल्पनिक कथा तुम्ही ऐकल्या असतील पण एखाद्या हरणाला सूड उगवताना पाहिलेत का कधी ? हरणाच्या सूडचा व्हिडिओ इंटरनेटवर तूफान गाजतो आहे. ४३ वर्षांच्या एका महिलेने हरणाला धडक दिली, पण धडक दिल्यानंतर घाबरुन न जाता या हरणाने गाडीचे दार उघडून आतल्या महिलेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. महिलेने कसेबसे या हरणाला गाडीबाहेर ढकलले. हा सारा प्रकार पोलिसांच्या कॅमे-यात कैद झाला.
एलेन या ४३ वर्षीय महिलेने रात्रीच्या सुमारास आपल्या गाडीने हरणाला धडक दिली. हरणाला धडक दिल्यानंतर एलन यांनी गाडीचा दरवाजा किंचित उघडून बघण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळीस या हरणाने दरवाजा उघडून एलेन यांच्यावर आपल्या शिंगानी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. एलेन यांनी या हरणाला कसेबसे बाहेर पिटाळले. न्यूजर्सीमधील होवेल येथे हा प्रकार घडला. हे सूडनाट्य सुरू असताना पोलिसांची गाडी मागून येत होती. या गाडीवर असलेल्या डॅशकॅमे-यावर हा प्रकार रेकॉर्ड झाला. ही घटना १५ दिवसांपूर्वीची आहे पण पोलिसांनी १५ दिवसांनंतर या फुटेज बाहेर आणले. हरणाचा हल्ल्यात एलेन या जखमी झाल्या आहेत. तर गाडीची धडक बसल्यानंतर झालेल्या जखमेमुळे हरणाचा देखील मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.