विशाखा कुलकर्णी – response.lokprabha@expressindia.com
हल्ली सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या चॅलेंजची हवा असते. नवीन नाटक, सिनेमा आला तर त्यासंबंधी चॅलेंज देऊन त्याचं प्रमोशन करतात. तर कधी कधी उगाच काहीतरी म्हणून नव्या चॅलेंजचे लोण पसरवले जाते.
मध्यंतरी काही चॅलेंजेस सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध झाले होते. स्तब्ध उभं राहून व्हिडीओ काढायचं मॅनेक्वीन चॅलेंज काही दिवसांपूर्वी जगभर प्रसिद्ध झालं होतं. ‘अमर फोटो स्टुडिओ’ या नाटकाच्या निमित्ताने स्वत:चा सर्वात जुना पासपोर्ट साइज फोटो टाकण्याचं चॅलेंज प्रसिद्ध झालं होतं. नाटकाच्या टीमने दिलेलं हे चॅलेंज कलाकार ते सामान्य असं सर्वानीच फॉलो केलं. सलग सात दिवस ब्लॅक अँड व्हाइट फोटो टाकायचे, कधी साडी नेसून फोटो टाकायचे अशा चॅलेंजचा ट्रेण्ड सोशल मीडियावर हिट झाला होता. या चॅलेंजेसच्या यादीतील ताजं उदाहरण म्हणजे नुकतंच गाजलेलं किकी चॅलेंज. तरुणाईने हिट केलेल्या या चॅलेंजमुळे पोलिसांची मात्र पंचाईत करून ठेवली होती. चालत्या गाडीतून उडी मारून नाचत व्हिडीओ काढायला लावणाऱ्या या निर्थक चॅलेंजमुळे अपघातांना आमंत्रणच मिळाले. सोशल मिडियावर चर्वण करण्यासाठी किंवा प्रसिद्धी मिळवण्यासाठी अशी चॅलेंजेस सतत येतच राहतात.
या चॅलेंजेसच्या यादीत आता वर्णी लागली आहे ती डेले चॅलेंज या नव्या चॅलेंजची! नुकत्याच झालेल्या प्रीमियर लीगमध्ये फुटबॉलपटू डेले अलीने ही भन्नाट ‘मुद्रा’ करून जल्लोष व्यक्त केला. त्याने सलामी दिल्यासारखा वाटत असलेला त्याचा फोटो काढला आणि असा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्याच्यानंतर तसाच फोटो त्याच्या सहकाऱ्यांनीसुद्धा काढल्यानंतर हे डेले चॅलेंज जोरदार व्हायरल झालं.
या चॅलेंजमध्ये करायचं काय? तर डेलेने केलेली पोझ आपण करायची आणि त्याचा फोटो पोस्ट करायचा. आता एवढं सोपं असतं तर यात व्हायरल होण्यासारखं ते काय? नाही का. तर मजा या पोझमध्ये आहे. ही पोझ पाहणाऱ्याला अगदीच साधी सोपी वाटते. आणि तशी करताना मात्र अजिबात सोपी नाहीये. खरंतर दिसताना ‘ओके’ची साइन किंवा आपल्याकडे ज्ञानमुद्रेमध्ये जसा हात असतो तसा दिसणारा हात प्रत्यक्षात या चॅलेंजमध्ये करायला बऱ्यापैकी किचकट आहे. फोटोत सोपं वाटणारं हे चॅलेंज प्रत्यक्षात करताना मात्र सगळ्यांची तारांबळ उडते. मग हे चॅलेंज समोर आलं की तसं करताना होणारी लोकांची तारांबळ दुसऱ्याला बघताना अत्यंत विनोदी दिसते. ट्रेनमध्ये, ऑफिसमध्ये ग्रूप फोटोमध्ये असं डेले स्टाइलने फोटो काढणारे मित्र-मत्रिणी हल्ली सर्रास दिसतात.
हे डेले चॅलेंज आत्तापर्यंत अनेक फुटबॉलपटू, सेलेब्रेटीज, बॉलीवूड स्टार्स यांच्यासह मराठी सिनेसृष्टीतही अगदी हिट झालं आहे. हातांची बोटे शक्य तितकी वळवून एकदाचं हे जमलं, की ‘‘जमलं बुवा एकदाचं’’ असं वाटल्याशिवाय राहवत नाही. हे लोकांना जमतं न जमतं, तोच हे लोण एक पाऊल पुढे गेलंही. आता आधीच किचकट वाटणाऱ्या या डेले चॅलेंजची चक्क पुढची पायरी निघाली आहे ती म्हणजे डेले चॅलेंज २.०
आता यात एकाच हाताने दोन्ही डोळ्यांवर ‘चष्मा’ अर्थात एकाच हाताने दोन्ही डोळ्यांभोवती गोल करून सेल्फी काढायचा. आता हे करायचं म्हणजे एकदम लवचीक बोटं हवीत. शेवटी ये सोशल मिडिया है बॉस. इथे अक्षरश: काहीही पिकतं आणि विकतंसुद्धा! आणि कितीही स्टुपिड गोष्ट ‘कूल’ वाटू शकते.
या डेले चॅलेंजचा थोडा मागोवा घेतला तर या मुद्रेमागेही काहीतरी अर्थ आहे हे लक्षात येतं. एका नायजेरियन फुटबॉलपटूच्या सांगण्यानुसार सोशल मीडियावर हिट झालेल्या या चॅलेंजच्या मुद्रेचा वापर खरंतर एखाद्या मिलिटरीच्या जाचातून पळून आलेल्या व्यक्ती करतात. नायजेरियामध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्या, लष्कराची आज्ञा न पाळणाऱ्या सामान्य स्त्री, पुरुष आणि मुलांचेही डोळे काढण्याची भयंकर शिक्षा दिली जाते. या शिक्षेतून सुटलेले लोक ही मुद्रा करतात. त्यामुळे या चॅलेंजमुळे कुठेतरी याकडे लक्ष वेधले जाणार आहे. खरंतर या चॅलेंजची क्रेझ इतकी वाढली आहे, की यामागे काही अर्थ आहे किंवा नाही याचा फारसा विचारही न करता हा ट्रेण्ड फॉलो होतोय. यातच या ट्रेण्डचा जनक असलेल्या डेलेने ही मुद्रा चक्क ढापलीय असाही आरोप करण्यात आला. पण या गोष्टींमुळे या चॅलेंजची हवा काही कमी झालेली नाही.
सो.. तुम्हीही केलंच असेल ना एव्हाना हे डेले चॅलेंज? नसेल केलं तर नक्की ट्राय करा. आता एवढं त्याबद्दल बोलून झालं, तर हे चॅलेंज कसं करायचं ये बताना तो बनता है!
तर आधी ‘सुंदर’ असं सांगताना करतो तशी मुद्रा अर्थात ज्ञानमुद्रा करायची. अंगठा आणि तर्जनीमुळे तयार होणाऱ्या गोलाच्या खाली उरलेली तीन बोटे न्यायची. आणि आता हा हात फिरवून डोळयापाशी न्यायचा.. सोप्पंय ना! काय? जमतंय का? मग पटकन आपल्या दोस्तांनाही चॅलेंज करा.
सौजन्य – लोकप्रभा