17-year-old JEE aspirant dies by suicide: भारतात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. अशातच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मानसिक ताण तणावही दुसरीकडे वाढताना दिसत आहे. याच तणावातून विद्यार्थी आत्महत्येचं पाऊल उचलताना गेल्या काही वर्षांत पाहायला मिळतंय, आता पुन्हा एकदा असाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये १७ वर्षीय तरुणीने घराच्या बाल्कनीतून उडी मारत आत्महत्या केली आहे. पोलिसांनी सांगितले की, मुलीने एक सुसाईड नोट लिहिली आहे, ज्यामध्ये “आई मला माफ कर, मी नाही करू शकले” असं म्हणत जेईई परीक्षा पास होऊ न शकल्यामुळे तिने हे पाऊल उचललं आहे. तरुणीने बाल्कनीतून उडी मारत आत्महत्या केल्याचा सीसीटीव्ही व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

“आई मला माफ कर मी नाही करु शकले”

ही घटना दिल्लीत घडली असून शाहीन बाग येथील रहिवासी असलेल्या या मुलीने १२वी उत्तीर्ण केली होती आणि ती जेईई (जॉइंट एंट्रन्स परीक्षा) परीक्षेची तयारी करत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिने आधी आईला सांगितले होते की, जर ती जेईई पास करू शकली नाही तर ती आत्महत्या करेल. तरुणीने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती, यामध्ये “आई मला माफ कर, मी नाही करू शकले” असं लिहलं होतं.

या तरुणीच्या आत्महत्येचा व्हिडीओही समोर आला असून सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की, मोकळा रस्ता आहे आणि रस्त्याच्या कडेला एक व्यक्ती पाठीवर बॅग घेऊन उभा आहे. तो फोनवर कोणाशी तरी बोलत असतो, यावेळी एक तरुण दुचाकीवरून जात आहे. बाईक पुढे जाताच एक मुलगी बिल्डिंगवरून जोरात खाली पडते. ही घटना पाहिल्यानंतर परिसरात लोकांची गर्दी जमते. स्थानिक लोकांनी विद्यार्थिनीला उपचारासाठी रुग्णालयात नेले, मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “शेवटी हिशोब कर्माचा होतो” पोलिसानं गरीब रिक्षा चालकाबरोबर काय केलं पाहा; VIDEO बघून डोळ्यांत येईल पाणी

दरम्यान, या घटनेसंदर्भात जामियानगर पोलिस पुढील तपास करत आहेत. एका अधिकाऱ्याने सांगितले की, पीडितेचे वडील खाजगी कर्मचारी आहेत, तर तिची आई गृहिणी आहे.