अभिनेता अजय देवगण आणि सैफ अली खान यांची मुख्य भूमिका असलेला ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ हा ऐतिहासिकपट सध्या तिकीट खिडकीवर तुफान चालत आहे. या चित्रपटातील काही प्रसंगाला मॉर्फिंग केलं आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, नरवीर तानाजी मालुसरे यांच्या चेहऱ्यावर अमित शाह यांचा चेहरा लावण्यात आला आहे. सध्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिकेला पोहचला आहे. त्याच पार्श्वभूमीवर पोलिटिकल कीडा या ट्विटर हँडलवरून हा मार्फ केलेला व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या प्रकारावर ट्विटवरून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. सायबर सेलला टॅग करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ट्विटरवर करण्यात येत आहे.
पोलिटिकल किडा या ट्विटर हँडलवरून ही चित्रफित पोस्ट केल्यानंतर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावर महाराष्ट्रातून तीव्र प्रतिक्रिया टाकण्यात आल्या आहेत. हा व्हिडीओ तात्ळाळ डिलीट करावा आणि माफी मागावी, अन्यथा याचे परिणाम वाईट होतील अशा प्रतिक्रिया ट्विटरवर उमटत आहेत.
काय आहे नेमकं या व्हिडीओत?
या व्हिडीओत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, नरवीर तानाजी मालुसरे यांच्या चेहऱ्यावर अमित शाह आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना उदयभान राठोड दाखवण्यात आले आहे. हा व्हिडीओ भाजपाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट केलेला नाही. नरेंद्र मोदी व अमित शहा हे कोंढाणा किल्ल्याप्रमाणे दिल्लीसाठी युद्ध करायला तयार असल्याचे या व्हिडीओत दाखविण्यात आले आहे. ‘शाहीन बाग से उन्होंने वोट बँक की राजनिती शुरू की है, आखरी दांव हम खेलेंगे,’ असे संवादही यात घालण्यात आले आहेत.
Delhi Election 2020 ft. Shah-ji pic.twitter.com/I1WFf3lYnL
— Political Kida (@PoliticalKida) January 19, 2020