आजकाल वडापाव म्हटल की, अनेकांच्या तोंडावर मुंबईपेक्षा दिल्लीतील सतत चर्चेत असणाऱ्या ‘फेमस वडापाव गर्ल’ चंद्रिका दीक्षितचे नाव पहिले येते. कधी आपली व्यथा सांगत, तर कधी तिचा व्हिडीओ शूट करण्यासाठी आलेल्या लोकांसह वादात अडकल्याने सोशल मीडियावर या वडापाव विक्री करणारीची चर्चा होतच असते. नुकत्याच काही दिवसांपूर्वी या चंद्रिकाला म्हणजेच, वडापाव गर्लला पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचेदेखील व्हिडीओ व्हायरल होत होते.
मात्र, सध्या ही वडापाव गर्ल कोणत्याही वादामुळे चर्चेत नसून, जवळपास कोटींची किंमत असणाऱ्या मस्टँग [Mustang] नावाच्या गाडीमधून फिरत असल्याने तिने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर चंद्रिकाने स्वतः या लक्झरी गाडीचे दोन व्हिडीओ शेअर केले आहेत. त्यातील पहिल्या व्हिडीओमध्ये रस्त्यावर मस्टँग गाडी पार्क केलेली आपल्याला पाहायला मिळते. इतकेच नाही तर त्या गाडीच्या आजूबाजूला लोकांची गर्दी [तुरळक] असल्याचे दिसते.
व्हिडीओ शूट करणारी व्यक्ती “आत्ता माझ्यासमोर मस्टँग ही गाडी उभी आहे. त्याच्या आजूबाजूला एवढी गर्दी का आहे ते पाहू.” अशा प्रकारे बडबड करत तिथे उभ्या असणाऱ्या व्यक्तीला गाडी उघडण्यास सांगतो. गाडीच्या डिक्कीचे दार उघडताच, त्या डिक्कीमधून दिल्लीची फेमस वडापाव गर्ल हातात पावाची एक ताटली घेऊन बाहेर पडते आणि “काहीतरी मोठं घडणार आहे, प्रतीक्षा करा” असे म्हणते. तिचे हे वाक्य संपताच आजूबाजूची लोकं जोरजोरात टाळ्या वाजवतात. नंतर चंद्रिका [वडापाव गर्ल] गाडीच्या डिक्कीतून बाहेर पडून, गाडीच्या पुढच्या सीटवर जाऊन बसते.
तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये चंद्रिका त्याच अत्यंत आकर्षक अशा मस्टँग गाडीतून उतरते आणि एका चकाचक दुकानात जाते. अर्थात, हा व्हिडीओ त्या दुकानाच्या जाहिरातीसाठी होता. त्या दुकानात जाऊन वडापाव गर्लने चक्क आयफोन १५ घेतल्याचे आपण पाहू शकतो. नंतर आयफोनसह इतर गोष्टीही तिला देण्यात येत होत्या.
असे हे दोन व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता याबद्दल नेटकऱ्यांचे काय म्हणणे आहे पाहू.
“किती बेरोजगार आहेत आपल्या देशातील लोकं”, असे एकाने लिहिले आहे.
“बंद कर बाई तुझी ही नाटकं. तू कुणीही प्रसिद्ध व्यक्ती नाहीस, जरा कमी फेकत जा…” असे दुसऱ्याने लिहिले आहे.
“पण, हिला तर पोलिसांनी पकडून नेलं होतं ना?” असा प्रश्न तिसऱ्याने केला आहे.
“ही गरीब घरातील आहे… कुणी काही बोलू नका…” असे चौथ्याने उपहासाने लिहिले आहे.
“दुकानासाठी पैसे नाहीत, पण आयफोन घ्यायला पैसे आहेत…” असे पाचव्याने लिहिले.
व्हिडिओ पाहा :
इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर chandrika.dixit नावाच्या अकाउंटने, म्हणजेच फेमस वडापाव गर्लने हे दोन व्हिडीओ शेअर केले आहेत. दोन्ही व्हिडीओला आत्तापर्यंत एक मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.