Delhi hit and run case Accused SUV driver who hit biker arrested vehicle seized: दिल्लीमधील गुन्हेगारी घटनासंदर्भात वेळोवेळी बातम्या समोर येत असतानाच राजधानीमधून नुकताच एक धक्कादायक व्हिडीओ समोर आलाय. रस्त्यावरील हाणामारी आणि वाहतुक कोंडीदरम्यान झालेल्या वादांमधून प्रकरणं थेट पोलीस स्थानकापर्यंत पोहचल्याची अनेक उदाहरणं दिल्लीसाठी काही नवीन नाहीत. मात्र दिल्लीमधील अरजान घर मेट्रो स्थानकाजवळ रविवारी एक फारच विचित्र प्रकार काही दुचाकीस्वारांसोबत घडला. रस्त्यावर भरधाव वेगाने गाडी चालवणाऱ्या एका एसयुव्ही कार चालकाला दुचाकीस्वाराने हटकलं असता या कार चालकाने दुचाकीस्वाराला जखमी करण्याच्या हेतूने घडक दिली. हा सारा प्रकार याच दुचाकीस्वारांच्या गटातील अन्य एका व्यक्तीच्या हेल्मेटवरील कॅमेरात कैद झालाय. या प्रकरणात संबंधित कार चालकाला अटक करण्यात आलीय.

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीमधील अर्जना घर मेट्रो स्थानकाजवळ काही दुचाकीस्वार आणि कार चालकामध्ये गाडी बेशिस्तपणे चालवण्याच्या मुद्द्यावरुन वाद झाला. बाजूबाजूला गाडी चालवत असतानाच हा वाद सुरु होता. “आमचा ८ ते १० जणांचा दुचाकीस्वारांचा ग्रुप गुरुग्रामवरुन दिल्लीला परत येत होतो. त्यावेळी हा कारचालक आमच्या अगदी जवळून वेडीवाकडी गाडी चावलू लागला. त्याने माझ्या एका सहकाऱ्याला धमकावलं आणि शिवीगाळ केला. माझ्या मित्राने त्याच्या गाडीचा वेग कमी केला आणि मी पुढे गेलो. त्यावेळी या व्यक्तीने मागून येऊन माझ्या दुचाकीला कट मारली आणि तो वेगाने निघून गेला,” असं या दुचाकीस्वाराने एएनआयशी बोलताना सांगितलं.

काही तासांमध्येच दिल्ली पोलिसांनी या कार चालकाची ओळख पटवली. या प्रकरणी सुमोटो तक्रार दाखल करत पोलिसांनी या कार चालकाला ताब्यात घेतलं. तसेच या प्रकरणी तरुणांनी लेखी तक्रार देण्याचं आवाहनही पोलिसांनी केली. ही तक्रार फतेहपुरी बेरी पोलीस स्थानकात नोंदवली जाईल असंही पोलिसांकडून सांगण्यात आलं. पोलिसांनी या प्रकरणात खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. संबंधित व्यक्तीने तक्रार दाखल केल्यानंतर सोमवारी दुपारी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या तक्रारीमध्ये अपघातग्रस्त तरुण आणि कार चालकामध्ये वाद झाल्याचं नमुद करण्यात आलंय. आम्ही कलम ३०७ अंतर्गत (हत्येचा प्रयत्न) गुन्हा दाखल केला आहे, असं अतिरिक्त पोलीस आयुक्त (दक्षिण) एम हर्षवर्धन यांनी सांगितलं.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणामध्ये रात्रीपर्यंत या कार चालकाला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा कार चालक २६ वर्षांचा असून त्याची कारही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

या प्रकरणामध्ये आरोपीला कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून केली जात आहे.

Story img Loader