Delhi Housing Society Notice for Bachelors: हल्ली बऱ्याच निवासी सोसायट्यांमध्ये रहिवाश्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे नियम आखून दिलेले असतात. सोसायटीमधील रहिवाश्यांना कोणत्याही अडचणींचा त्रास होऊ नये, म्हणून हे नियम बनवलेले असतात. काही सदस्यांना ते मान्य असतात तर काहींना नसतात. सोसायटीत घडणाऱ्या अनेक गोष्टींबाबत सोसायटीची कमिटी नोटीस काढून संबंधितांना समज देत असते. ही बाब सर्वच सोसायट्यांमध्ये सामान्य असली, तरी सध्या दिल्लीतल्या एका सोसायटीनं इमारतीत राहणाऱ्या काही ‘बॅचलर्स’साठी काढलेली नोटीस व्हायरल झाली आहे. या नोटीसला काही नेटिझन्सनी समर्थन दिलं असून काहींनी विरोध केला आहे.

दिल्लीतील एका सोसायटीनं इमारतीत राहणाऱ्या काही बॅचलर्सला सक्त ताकीद देणारी नोटीस जारी केली आहे. यामध्ये बॅचलर्सकडून ऑनलाईन मागवण्यात येणाऱ्या पार्सल्सवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. तसेच, रोज मागवल्या जाणाऱ्या या पार्सल्सची संख्या एक किंवा दोनपर्यंत कमी करण्यासही या ‘बॅचलर्स’ला बजावण्यात आलं आहे.

काय आहे नोटीसमध्ये?

ही व्हायरल नोटीस दिल्लीतील असल्याचं सांगितलं जात आहे. या नोटीसमध्ये सोसायटीच्या वॉचमनला मोठ्या संख्येनं येणाऱ्या या पार्सल्सचा मनस्ताप होत असून त्याचं नियमित कामाकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार नमूद करण्यात आली आहे. “आपल्या सोसायटीतील वॉचमन **** यांनी काल रात्री रहिवासी कल्याण संघटनेची बैठक बोलावली होती. ते गेल्या ७ वर्षांपासून आपल्या सोसायटीत काम करत आहेत. पण त्यांचं म्हणणं आहे की सध्याच्या सणासुदीच्या दिवसांमध्ये दररोज मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या पार्सल्समुळे त्यांच्या नियमित कामावर परिणाम होत आहे”, असं या नोटीसमध्ये म्हटलं आहे.

delhi housing society notice for bachelors
दिल्लीतील सोसायटीची रहिवाश्यांसाठीची नोटीस व्हायरल (फोटो – सोशल व्हायरल)

“…नाहीतर वैयक्तिक सेक्युरिटी गार्ड नेमा”

“आपले वॉचमन रहिवाशांच्या वतीने हे पार्सल्स नेहमी स्वीकारतात. पण गेल्या काही दिवसांमध्ये त्याचा त्यांना त्रास होऊ लागला आहे. त्याशिलाय एफ ब्लॉकमध्ये राहणाऱ्या बॅचलर्सकडून रोज किमान १० ते १५ पार्सल मागवले जात आहेत. आमची सगळ्यांनाच विनंती आहे की त्यांनी रोजच्या पार्सलची संख्या १ ते २ पर्यंत मर्यादित करावी. ते शक्य नसल्यास कृपया हे पार्सल स्वीकारण्यासाठी तुमचे वैयक्तिक सेक्युरिटी गार्ड नेमावेत”, असा सल्लाही या नोटीसमध्ये देण्यात आला आहे. या नोटीसवर १८ सप्टेंबर, २०१४ अशी तारीखही नमूद आहे.

नेटिझन्सकडून संमिश्र प्रतिक्रिया

दरम्यान, ही नोटीस व्हायरल होऊ लागल्यानंतर नेटिझन्सकडून त्यावर संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. काही नेटिझन्सनी सोसायचीच्या बाजूने मत व्यक्त केलं असताना काहींनी त्याविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. “त्यांच्या म्हणण्यात तथ्य आहे. भारतात आपण समजतो की आपले सुरक्षा कर्मचारी सगळ्याच गोष्टींसाठी जबाबदार असतात. त्यांना तुमचं सामान गोळा करणारे समजू नका”, असं एका युजरनं म्हटलं आहे. तर “ही मागणी योग्यच आहे. रोज १०-१५ पार्सल कोण मागवतं?” असा मुद्दा दुसऱ्या एका युजरनं उपस्थित केला आहे.

Trending News: पुण्याचा विषयच भारी! या अतरंगी पुणेकर डान्सर्सनी वेधले सर्वांचे लक्ष, VIDEO होतोय व्हायरल

एका युजरनं मात्र नोटीसवर नाराजी व्यक्त केली आहे. “हे विचित्र आहे. सोसायटीकडूनच येणाऱ्या प्रत्येकाचं स्क्रीनिंग आणि नोंदणी सक्तीची करण्यात आली आहे. आता काय ते असं म्हणणार आहेत का की उत्सवांच्या काळात बाहेरून ऑर्डर्सही कमी मागवा?” असा प्रश्न एका युजरनं केला आहे.