Delhi Anjali Accident: दिल्लीतील कंझावाला येथे कारखाली आलेल्या अंजली सिंग या २० वर्षीय तरुणीला चालकाने १२ किलोमीटरपर्यंत फरपटत नेलं होतं. या अपघातात अंजलीचा मृत्यू झाला होता. तसेच तिचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत पोलिसांना आढळून आला होता. याप्रकरणी पोलिसांनी सात आरोपींना अटक केली होती. हे प्रकरण अजूनही चर्चेत असताना आता अंजलीच्या घरी चोरी झाल्यची माहिती समोर येत आहे. प्राप्त माहितीनुसार, चोरांनी टाळे तोडून अंजलीच्या घरातील एलसीडी टीव्हीची चोरी केली आहे. याबाबत अंजलीच्या मामाने तक्रार करून पोलिसांवर टीका केली आहे. पोलीस नक्की काय करतात असा थेट प्रश्न अंजलीच्या कुटुंबाकडून करण्यात आला आहे.
अंजलीच्या मृत्यनंतर तिचे कुटुंब अंजलीच्या मामाच्या घरी सुलतानपुरी येथे होते, यावेळी करन विहार येथील अंजलीचे घर रिकामे होते. याचा फायदा घेऊन चोरांनी तिच्या घरावर डाका टाकण्याचे ठरवले.
अंजलीचा मृत्यू कसा झाला?
दरम्यान, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी १ जानेवारीला अंजलीला अपघात झाला होता. अंजली व तिची मैत्रीण निधी स्कुटीवरून जात असताना एका कारने अंजलीला १२ किमी फरफटत नेले होते. या घटनेनंतर अंजलीच्या मैत्रिणीने तिथून पळ काढला. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत दीपक खन्ना (२६ वर्ष), अमित खन्ना (२५ वर्ष), कृष्ण (२७ वर्ष), मिथुन (२६ वर्ष) व मनोज मित्तल या ५ जणांना अटक केली होती. यानंतर आशुतोष व अंकुश खन्ना नामक तरुणांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतली. अंकुश खन्ना याने शुक्रवारी पोलिसांसमोर आपला गुन्हा काबुल केला आहे. अंकुश हा अपघाताच्या वेळी कार चालवत होता व मुख्य आरोपी अमित याचा तो भाऊ आहे असे समजतेय.
हे ही वाचा<< Delhi Accident : “अंजली वाचवा-वाचवा म्हणत होती, पण…”, दिल्ली अपघाताबाबत दुचाकीवरील मैत्रिणीचे धक्कादायक खुलासे
दरम्यान, या अपघातापूर्वी अंजलीने मद्यप्राशन केले होते, असा दावा अंजलीची मैत्रीण निधिने केला होता. मात्र, हे फेटाळून लावत हा अपघात षडयंत्र असल्याचा दावा अंजलीच्या आईने केला आहे.