कोरोना काळापासून घरातून काम करण्याची नवीन पद्धत उदयास आली आहे. त्यामुळे अनेक कर्मचारी ऑफिसला जाण्याऐवजी ‘वर्क फ्रॉम होम’ पद्धतीनेच काम करणं पसंद करतात. आता कोरोनाचा संसर्ग बऱ्यापैकी संपला असला तरीही अनेक कर्मचारी घरूनच काम करतात. पण सध्या ‘वर्क फ्रॉम होम’च्या नावाखाली लोकांची फसवणूक करणाऱ्या काही टोळ्या तयार झाल्याचंही पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली लोकांना नोकऱ्या देण्याचं आश्वासन दिलं जात आणि त्यांची आर्थिक फसवणूक केल्याची अनेक उदाहरण समोर येत आहेत.
सध्या अशीच एक घटना दिल्लीत घडली आहे. ज्यामध्ये एका तरुणाला नोकरी देण्याच्या नावाखाली त्याची जवळपास ९ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. तरुणाची फसवणूक करण्याऱ्या २ आरोपींना पोलिसांनी अटकही केली आहे. अटक केलेल्या आरोपींची नावं अंकीत (३० ) आणि सुधीर कुमार (४५ ) अशी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अंकीत आणि सुधीर या दोघांनी मिळून हरिन बन्सल नावाच्या तरुणाची ९ लाख रुपयांची फसवणूक केली. शिवाय त्यांनी या तरुणाला काम देतो असं सांगून त्याच्याकडून पैसे उकळल्याचंही उघडकीस आलं आहे.
हेही पाहा- महिलेने ऑर्डर केलेल्या जेवणात आढळला मेलेला उंदीर, रेस्टॉरंटमधील किळसवाणा Video व्हायरल
नेमकी कशी केली फसवणूक –
या घटनेची माहिती देताना दिल्ली पोलिसांनी सांगितले की, अंकित आणि सुधीरने सोशल मीडियावर एक नोकरीसंदर्भातील पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी घरी बसून काम करा आणि पैसे कमावा अशी ऑफर दिली होती. ही पोस्ट पाहून हरीनने त्यांनी दिलेल्या लिंकवर क्लिक केलं. त्यानंतर त्याने वेबसाइटवर स्वत:ची सर्व माहिती शेअर केली. व्हॉट्सअॅपच्या मदतीने हरीनने त्याची संपूर्ण माहिती अंकीत आणि सुधीरला दिली. त्यानंतर आरोपींनी हरीनला दिलेल्या लिंकवर पैसे जमा करायला सांगितले.
त्यानुसार हरीननेदेखील काही पैसे लिंकवर जमा केले. सुरुवातीला हरीनने भरलेली काही रक्कम त्याला कमिशनसहीत परत मिळाली. त्यामुळे त्याचा त्या दोघांवर चांगला विश्वास बसला, पण जेव्ही हरीनने ९ लाख ३२ हजार रुपये त्यांच्या लिंकवर जमा केले आणि त्याने ते पैसे काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मात्र ते निघत नसल्याचं त्याच्या लक्षात आलं. शिवाय आपली फसवणूक झाल्याचंही हरीनच्या लक्षात आलं. त्यामुळे त्याने लगेच पोलिसांत धाव घेतली आणि घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानुसार पोलिसांनी तक्रार दाखल केली आणि आरोपींना शोधून काढलं. तर ही दोन्ही आरोपी उत्तर प्रदेशीतील बागपत येथील रहिवासी असल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे.