PF Request Rejected Viral Post : गेल्या काही दिवसांपासून पीएफशी संबंधित बातम्या सातत्याने चर्चेत येत आहेत. अशात दिल्लीतील एका आयटी व्यावसायिकाने EPFO इंडियावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्याचे म्हणणे आहे की, त्याने पीएफमधून पैसे काढण्यासाठी दोन वेळा क्लेम रिक्वेस्ट पाठवली, पण EPFO इंडियाने कोणतेही कारण न देता त्याची PF क्लेम रिक्वेस्ट फेटाळली. यानंतर त्याने सोशल मीडियावर एक सविस्तर पोस्ट करत आपला संताप व्यक्त केला, तसेच ईपीएफओ इंडियालाही याबाबत जाब विचारला. त्याची ही पोस्ट आता चांगलीच व्हायरल होत आहे.
सुआंश सिंघल असे या आयटी व्यावसायिकाचे नाव आहे, जे कोझिकोडचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘ईपीएफओ इंडियाने कोणतेही योग्य कारण न देता पीएफमधून पैसे काढण्यासाठी केलेला क्लेम दोनदा फेटाळला.
सुआंश सिंघल यांनी त्यांच्या पोस्टमध्ये पुढे ईपीएफओने पैसे काढण्यासाठीची रिक्वेस्ट नाकरताना दिलेले कारण स्पष्ट करत म्हटले की, “चेतावणी: अनेक लोक एकच बँक खाते वापरत आहेत.” “एक नागरिक त्याच्या आधार नंबरची पडताळणी करत कॅन्सल चेकदेखील सबमिट करतो. यापलीकडे पीएफमधून बँक खात्यात पैसे परत मिळविण्यासाठी आणखी काय आवश्यक आहे. संपूर्ण विमा क्षेत्रदेखील या साध्या नियमाचे पालन करत आहे. पण माझ्याबरोबर जी गोष्ट घडतेय ती माझ्या समजण्याच्या पलीकडे आहे. असे मी दोन वेगवेगळ्या बँक खात्यांद्वारे करून पाहिले आहे.”
सुआंश यांनी संताप व्यक्त करत पुढे लिहिले की, “अनेक वर्षांपासून पीएफमध्ये योगदान देऊनही, मल्टीपल आयडीच्या मुद्द्यावरून ईपीएफओने कधीही प्रश्न केला नाही. आता पैसे मिळवण्यासाठी क्लेम केल्यानंतर सर्व प्रकारच्या तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे”,
सुआंश यांनी पुढे म्हटले की, “तुम्ही दर महिन्याला आणि अनेक वर्षांपासून पीएफमध्ये योगदान देत आहात, परंतु त्यांना तु्म्हाला अधिक माहितीसाठी फोन किंवा ईमेल पाठवायला वेळ नाही. डेस्कटॉपवर बसलेला एजंट दोन ओळी कॉपी आणि पेस्ट करतो आणि तुमची क्लेम रिक्वेस्ट नाकारतो, अशावेळी तुम्हाला पुढे काय करावे असा प्रश्न पडतो”.
सुआंश सिंघल यांनी त्यांच्या @SuanshSinghal या एक्स अकाउंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे, ज्यावर आता EPFO ने आपली प्रतिक्रिया दिली आहे. EPFO ने यावर उत्तर दिले की, “प्रिय सदस्य, कृपया तुमचा UN नंबर द्या, जेणेकरून आम्ही तुम्हाला मदत करू शकतो”. दरम्यान, अनेकांनी ईपीएफओच्या गलथान कारभारावर आता ताशेरे ओढले आहेत. तसेच पीएफ काढताना त्यांना येत असलेल्या अडचणी सांगितल्या आहेत.