देशात रुग्णवाढीचा आलेख गेल्या सात दिवसांत सर्वाधिक उसळला असून त्यामुळे चिंता निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने वीकेंड कर्फ्यू जारी केला आहे. हा वीकेंड कर्फ्यू शुक्रवारी रात्री १० वाजता सुरु होऊन सोमवारी पहाटे ५ वाजेपर्यंत असेल. या बद्दल माहिती देताना दिल्ली पोलिसांनी एक ट्विट केले आणि नागरिकांना शनिवार रविवारच्या कर्फ्यूबद्दल काही शंका असल्यास त्या कमेंटमध्ये कळवण्याचे आवाहन केले.
“कोविड-१९ लक्षात घेता, उद्यापासून दिल्लीत वीकेंड कर्फ्यू लागू केला जात आहे. तुम्हाला यासंबंधी काही प्रश्न असल्यास दिल्ली पोलीस त्यांची उत्तरे देईल. कृपया तुमच्या शंका कमेंटमध्ये सांगा किंवा #CurfewFAQ याचा वापर करून आम्हाला ट्विट करा.” असे आवाहन दिल्ली पोलिसांनी ६ जानेवारीला केले होते.
पोलिसांनी जनतेला त्यांच्या शंका विचारण्याचं आवाहन केल्यानंतर एका नेटकाऱ्याने या संधीचा फायदा घेत त्याची शंका पोलिसांसमोर मांडली. ‘सामाजिक अंतर आणि मास्कचा वापर करून आम्ही क्रिकेट खेळू शकतो का?’ असा प्रश्न या नेटकाऱ्याने पोलिसांना विचारला आहे.
नेटकऱ्याच्या या प्रश्नावर पोलिसांनी भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे. “हा सिल्ली पॉईंट आहे सर. ‘एक्स्ट्रा कव्हर’ घेण्याची वेळ आली आहे. तसंच, दिल्ली पोलीस ‘पकडण्यात’ तरबेज आहे.” असं हटके उत्तर पोलिसांनी दिलंय.
देशाच्या राजधानीत शुक्रवारी १७,३३५ नवे करोनाबाधित आढळले असून ९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीचा पॉजिटिव्हिटी रेट हा १७.७३ टक्क्यांवर पोहोचला असल्याने करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने वीकेंड कर्फ्यू लागू केला आहे. ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅन (GRAP) अंतर्गत, दिल्लीमध्ये आधीच येल्लो अलर्ट लागू करण्यात आले होते. या अंतर्गत सर्व जिम, सभागृह, क्रीडा संकुल, हॉल पूर्णपणे बंद करण्यात आले असून दिल्लीमेट्रो, रेस्टॉरंट्स आणि बारला ५० टक्के क्षमतेने काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. दिल्लीमध्ये जीआरएपी (GRAP) अंतर्गत रात्रीचा कर्फ्यूदेखील लागू करण्यात आला आहे.