Delhi Rain: राजधानी दिल्लीत पावसाने धुमाकूळ घातला आहे. पावसामुळे सर्व यंत्रणा कोलमडली असून ठिकठिकाणी पाणी भरलं आहे. रस्त्यांपासून ते अनेक गल्ल्या, अंडरपास पाण्याखाली बुडाले आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या अडचणी वाढल्या असून, पाण्यातून प्रवास करण्याची वेळ आली आहे. अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी घुसलं आहे. दरम्यान, परिस्थितीशी तोंड देण्यासाठी दिल्ली सरकारने सर्व मनुष्यबळ कामाला लावलं आहे. दिल्ली सरकारने सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची रविवारची सुट्टी रद्द केली आहे.अशा परिस्थितीत दिल्लीतील विविध ठिकाणांहून पाणी तुंबण्याचे आणि नाले तुंबण्याचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथेही पाणी साचल्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहनेही पाण्याखाली गेले आहेत. दरम्यान, आता एक व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. प्रत्यक्षात मुसळधार पावसामुळे एक दुचाकीस्वार बांधकाम सुरू असलेल्या नाल्यात पडला आणि त्याची दुचाकी नाल्यात कुठेतरी वाहून गेली. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ दिल्लीच्या संगम विहार भागातील आहे. मुसळधार पावसामुळे बांधकाम सुरू असलेल्या नाल्याची दुरवस्था झाली आहे. सर्वत्र पाणीच पाणी होते. यादरम्यान एका दुचाकीस्वाराची दुचाकी या नाल्यात पडली. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, हेल्मेट घातलेला माणूस घाणेरड्या नाल्याच्या पाण्यातून त्याच्या दुचाकीचा शोध घेत आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – डिलिव्हरी बॉय ‘पिझ्झा’ द्यायला गेला, पण दरवाजा उघडल्यावर जे काही पाहिलं…, तुम्हालाही बसेल धक्का!
गेल्या दोन दिवसांत दिल्लीतून असे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांचे मोठे नुकसान झाले. दिल्लीत या मुसळधार पावसामुळे लोकांचे प्रचंड हाल झाले आहेत. कॅनॉट प्लेसमधील अनेक दुकानांमध्येही पाणी साचले होते. त्याचवेळी या पावसामुळे टिब्बिया कॉलेज सोसायटीच्या फ्लॅटचे छत कोसळले, त्याखाली अडकून एका महिलेचा मृत्यू झाला.