गेल्या दोन-तीन दिवासांपासून मध्यप्रदेशात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अनेक नदी-नाले तुडंब भरून वाहत आहेत. त्यामुळे अनेक गावांचा शहराशी संपर्क तुटला असून पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, मध्यप्रदेशमधील एका आगळ्या वेगळ्या लग्नाच्या वरातीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. येथे मुसळधार पावसात निघालेल्या लग्नाच्या मिरवणुकीत नवरदेवाला चक्क खांद्यावर घेऊन वाहती नदी पार केली. नदीच्या दोन्ही बाजूला ट्रॅक्टरला जाड दोरी बांधून ठेवली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
नरसिंगपूर येथील नोन पिपरिया गावात मुसळधार पावसामुळे गावाचा मुख्य रस्त्याचा शहराशी संपर्क तुटला. दरम्यान, जबलपूर जिल्ह्यातील चारगवान गावात राहणारे मोहन पटेल यांचे २८ जून रोजी लग्न होते त्यांच्या लग्नाची वरात नरसिंगपूरच्या नोन पिपरिया गावात जाणार होती. लग्नाची वरात थाटामाटात सुरू झाली पण नवरीच्या घरी पोहोचण्यापूर्वी ती नदीजवळ अडकली. येथे लग्नाला आलेल्या वऱ्हाडाला चक्क दोरीच्या साहाय्याने खळकळ वाहणारी नदी पार करावी लागली.
हेही वाचा – धो धो पावसात आनंदाने नाचताना दिसले झोमॅटो कर्मचारी; AI फोटोंनी जिंकले सर्वांचे मन
वऱ्हाड्यांनी पुलाच्या दोन्ही बाजूला ट्रॅक्टरच्या मदतीने एक मोठी दोरी बांधली होती. त्यानंतर काही लोकांनी नवरदेवाला खांद्यावर घेतले आणि दोरीच्या मदतीने नदी पार केली. जोरदार प्रवाह असूनही काही लोकांनी भटजी आणि बाकी वऱ्हाडी मंडीळींना एक एक करून नदी पार करायला लावली.
अशा प्रकारे लग्नाची वरात नवरीच्या घरी पोहोचला. लग्नाचे सर्व विधी पूर्ण झाल्यानंतर लोकांनी पुन्हा वऱ्हाडी मंडीळी आणि नवरा नवरीला त्याच प्रकारे नदी पार करायला लावली. दरम्यान कोणीतरी या प्रसंगाचा व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला.
नवरदेवावराचे शेजारी सीताराम पटेल यांनी सांगितले की, ही सर्व करताना जीवाला धोका खूप जास्त होता. दोरीच्या साहाय्याशिवाय त्याने तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला असता तर तो वाहून गेला असता. लग्नाची वेळ जाऊ नये म्हणून नाइलाजाने लग्नाची वरात अशा प्रकारे वाहत्या नदीतून आणावी लागली.