सध्या मार्केटमध्ये अनेक प्रकारच्या इलेक्ट्रिक व्हीलचेअर पाहायला मिळतात. मात्र, या व्हीलचेअरसाठी तुम्हाला लाखभर रुपये तरी मोजावे लागतात. अशा परिस्थितीत अनेकांना ती खरेदी करणे शक्य नसते. पण, एका पठ्ठ्याने जुगाडच्या मदतीने इलेक्ट्रिक व्हीलचेअर बनवण्याचा प्रयत्न केला आहे; ज्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने देसी जुगाडच्या मदतीने सामान्य व्हीलचेअरला ऑटोमॅटिक अॅडव्हान्स व्हीलचेअरमध्ये रूपांतरीत केले आहे.
व्यक्तीचा हा जुगाड आता सोशल मीडिया युजर्सनाही फार आवडला आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका व्हीलचेअरला बाइकचे इंजिन जोडलेले दिसत आहे. हे इंजिन व्हीलचेअरच्या मागच्या बाजूला बसवलेले आहे. यावेळी ती व्यक्ती किक मारून इंजिन सुरू करते आणि नंतर व्हीलचेअरवर बसते.
त्यानंतर ती व्यक्ती समोरचे हॅण्डल फिरवून वेग वाढवते; ज्यामुळे व्हीलचेअर पुढे जाऊ लागते. हा जुगाड पाहून लोक त्या व्यक्तीचे कौतुक करीत आहेत. पण, कोणत्याही अपंग व्यक्तीसाठी हे इंजिन सुरू करून, मग व्हीलचेअरचा वापर करणे काही प्रमाणात आव्हानात्मक ठरू शकते, असे काहींचे मत आहे.
पण, प्रत्यक्षात व्हीलचेअरबाबत असे काही प्रयोग यापूर्वीही झाले आहेत; ज्यासाठी त्यांनी बाइकच्या इंजिनाचा वापर केला होता. हा उपाय प्रभावी आहे; पण तो सोपा नाही. कारण- इंजिन सुरू करण्यासाठी किक मारण्याची आवश्यकता असते आणि प्रत्येक विकलांग व्यक्तीला तसे करणे जमेलच असे नाही. त्यामुळे जुगाडपासून बनवलेल्या या व्हीलचेअरमध्ये काही बदल केले गेले, तर ही व्हीलचेअर खूपच उपयुक्त ठरू शकते.