Desi Jugaad Video : नवीन कार घेण्याऐवजी हल्ली सेकंड हँड कार म्हणजे जुनी कार खरेदी करण्याचा ट्रेंड वाढतोय. कमी पैशात अगदी बजेटमध्ये लोकांना चांगली सेकंड हँड कार मिळते. त्यामुळे भारतात सेकंड हँड कारचं मार्केट झपाट्याने वाढतेय. पण, हल्ली सेकंड हँड कारबरोबर सेकंड हँड टायर खरेदी करणाऱ्या चालकांची संख्याही वाढताना दिसतेय. प्रवासादरम्यान अनेकदा रस्त्यावर कारचे टायर फुटतात. अशावेळी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या लहान गॅरेजमधून कारचे टायर बदलून घेतले जातात. पण, अशा गॅरेजमध्ये तुम्हाला नव्या टायरच्या नावाखाली चक्क जुनाच टायर अगदी नव्यासारख्या चमकवून विकला जातो. त्यामुळे तुम्हीदेखील असे टायर्स विकत घेत असाल तर जरा थांबा. कारण असे टायर्स अपघाताचे कारण ठरू शकते. तुमचा विश्वास बसत नसेल तर सोशल मीडियावर सध्या व्हायरल होणारा हा व्हिडीओ एकदा पाहाच.

साधारणपणे कारच्या नव्या टायरची किंमत कमीत कमी पाच ते सहा हजार रुपयांच्या दरम्यान असते. परंतु, तुम्हाला काही गॅरेजमध्ये अगदी १००० ते १२०० रुपयांनादेखील कारचा टायर मिळून जातो. कमी किमतीत नवा टायर मिळतो हे पाहून तुम्हीदेखील खूश होत असाल, पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, कमी किमतीत मिळणारे हे टायर्स कितपत सुरक्षित असतात. त्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवाची काळजी असेल तर एकदा हा व्हायरल व्हिडीओ तुम्ही पाहायलाच हवा.

जुन्या टायरला बनवले अगदी नव्यासारखे

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये टाकाऊ टायर्सचे नवीन टायरमध्ये रूपांतर कसे केले जाते हे दाखवण्यात आले आहे. त्याची संपूर्ण निर्मिती प्रक्रिया व्हिडीओमध्ये दिसत आहे, जी खूपच आश्चर्यकारक आहे. यातील टायर पाहिल्यावर तो जुन्या टायरपासून बनवलेला आहे हे ओळखणेही कठीण होईल.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती जुना टायर नीट कापून त्याला डिझायन देत नवीन बनवण्याचा प्रयत्न करत आहे. संपूर्ण टायरला नीट डिझाइन देत कापत त्याला चांगली ग्रीप दिली जात आहे. यानंतर दुसरी व्यक्ती टायर पॉलिश करते आणि ते अगदी नव्यासारखे चमकवते. यानंतर तो टायरवर प्राइस टॅग लावतो आणि तो टायर अगदी नवीन असल्याप्रमाणे प्लास्टिक रॅपमध्ये गुंडाळतो. अशाप्रकारे जुनेच टायर नव्यासारखे चमकवून ग्राहकांना नवे असल्याचे सांगून विकले जातात. पण, अशा टायरचा वापर करून तुम्ही एकप्रकारे अपघाताला स्वत:हून निमंत्रण देत असता.

हा व्हिडीओ @vinod_sharma नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘अधिकृत डीलर्सकडूनच नेहमी नवीन टायर खरेदी करा. पैसे वाचवण्याच्या प्रयत्नात तुम्ही तुमचा जीवही गमावू शकता. हा धक्कादायक व्हिडीओ पाहा.

या व्हिडीओला हजारो लोकांनी लाईक करून त्यावर विविध प्रकारच्या कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी चालकांना या फसवणुकीपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. तसेच अपघात टाळण्यासाठी स्वस्तात मिळणारे टायर्स न वापरण्याच्याही सुचना दिल्या आहेत.