Desi Jugaad Video : कोणत्याही प्रकारचं व्यसन हे वाईट मानलं जातं, कारण ते कोणत्या तरी मार्गाने व्यक्तीला कमजोर बनवते. अनेकदा व्यसनातून व्यक्तीला सहज बरे होता येते, पण धूम्रपान, दारू आणि चहाच्या व्यसनापासून सहज दूर होणे कठीण मानले जाते. यात काहींना सिगारेट ओढण्याची सवय सोडणे खूप आव्हानात्मक बनवते, कारण ही सवय सोडण्यासाठी तुमची इच्छाशक्तीच मजबूत असावी लागते. फार कमी लोक असतात, जे या व्यसनापासून दूर जातात. अशाचप्रकारे तुर्कीतील एका व्यक्तीने सिगारेटचे व्यसन सोडण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण काही केल्या ते जमत नव्हते. अखेर त्याने सिगारेट तोंडापर्यंत पोहोचू नये यासाठी असा काही जुगाड शोधून काढला की तो आता व्हायरल होतोय.
तुर्कीमधील इब्राहिम युसेलने २६ वर्षांपासून असलेले सिगारेटचे व्यसन सोडण्यासाठी एक अनोखा जुगा़ड केला होता. सिगारेट तोंडापर्यंत पोहोचूच नये यासाठी त्याने स्वतःचे डोकं लोखंडी पिंजऱ्यात बंद केले होते. ११ वर्षांपूर्वीची ही घटना असल्याचे सांगितले जातेय, पण ती नव्याने व्हायरल होतेय.
व्हि़डीओत तुम्ही पाहू शकता की, चेहऱ्याच्या आकाराच्या एका गोलाकार लोखंडी पिंजऱ्याने त्याने आपला चेहरा झाकला आहे. पिंजऱ्याची जाळी अतिशय बारीक आहे, ज्यामुळे त्याला कितीही इच्छा झाली तरी तो सिगारेट तोंडाने ओढू शकत नव्हता. त्या व्यक्तीने पिंजऱ्याची चावी आपल्या पत्नीला दिली होती, जेणेकरून ती त्याला गरज वाटेल तेव्हा खोलू शकेल. त्याने हे यासाठी केले, कारण त्याला कोणत्याही परिस्थितीत सिगारेटचे व्यसन सोडायचे होते. युसेल दिवसातून दोन पॅक सिगारेट ओढायचा आणि गेल्या दोन दशकांमध्ये त्याने अनेक वेळा ही सवय सोडण्याचा प्रयत्न केला होता.
कधी मुलांच्या वाढदिवसाच्य दिवशी तर कधी लग्नाच्या वाढदिवसाला तो असे प्रयत्न करत असे, पण तो नेहमी अपयशी ठरला. काही वेळाने तो पुन्हा सिगारेट ओढू लागला. पण, त्याचे सिगारेटचे व्यसन सोडण्याची ही पद्धत चांगलीच व्हायरल झाली होती. मात्र, यामुळे त्याचे सिगारेटचे व्यसन सुटले की नाही हे कळू शकले नाही.
व्हिडिओ झाला व्हायरल
आता इतक्या वर्षांनंतर युसेलचा हा व्हिडीओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. @PicturesFoIder या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केले गेला आहे, ज्याला आतापर्यंत २६.४ मिलियन व्ह्युज मिळाले आहेत. अनेक युजर्सनी यावर कमेंटही केल्या आहेत.