Desi Jugaad Video : डेंग्यू, मलेरियासारख्या गंभीर आजारांसाठी कारणीभूत असलेले डास अर्थात घरातल्या सर्वांनाच त्रासदायक ठरतात. उन्हाळ्यातही अनेक घरांत या डासांचा हैदोस पाहायला मिळतो. विविध उपाय करूनही जेव्हा डास चावतात तेव्हा नक्कीच खूप चिडचिड होते. दरम्यान, या डासांपासून सुटका मिळविण्यासाठी एका आईने भन्नाट जुगाड शोधून काढला आहे. तिने डासांना पळवण्यासाठी आपल्या चिमुकल्याच्या खेळण्याचा वापर केलाय आणि हा उपाय अनेकांना फार आवडला आहे.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एका आईने आपल्या मुलाच्या दोन पंख असणाऱ्या एका खेळण्यावर डास मारण्याच्या दोन कॉइल्स अडकवल्यात. त्यानंतर ते खेळणे घरात जमिनीवर सोडले. हे असे खेळणं आहे की, जे घरातील प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचू शकते. हे खेळणे लपलेल्या डासांपर्यंतही पोहोचत असल्याने डासांना पळवण्याचा हा उपाय अनेकांना फार आवडलाय. काहींनी म्हटलेय की, असा भन्नाट उपाय सुचायलाही जबरदस्त डोकं लागतं. कारण- प्रत्येकालाच असं काही सुचू शकत नाही.

व्हिडीओतील डासांना पळवण्याची ही पद्धत पाहून अनेकांना हसू आवरणे अवघड झालेय; तर काहींनी या जुगाडचे कौतुक केलेय. कमेंट्समध्येही लोक या जुगाडवर कमेंट्स करताना दिसतायत. एका युजरने लिहिलेय की, या कल्पनेमुळे संपूर्ण डासांच्या टोळ्यांमध्ये आता भीतीचे वातावरण निर्माण झाले असेल. दुसऱ्याने लिहिलेय की, भारी आयडिया आहे, डास ऑटोमेटिक घरातून बाहेर पळतील. तिसऱ्याने लिहिलेय की, हे टॅलेंट भारताबाहेर जायला नको.

Story img Loader