डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा राम रहिम यांना बलात्कार आणि लैंगिक शोषण प्रकरणी दोषी ठरविण्यात आलं असून त्यांना २० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षाही ठोठावण्यात आली आहे. या सगळ्या प्रकरणाची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु असून त्यांच्यासोबत त्यांची दत्तक मुलगी हनीप्रीत इन्सा हिच्याबाबतच्या काही गोष्टी समोर आल्या. बाबा राम रहिम प्रत्यक्ष रोहतक तुरुंगात जाईपर्यंत हनीप्रीत त्यांच्या सोबत असल्याचेही पहायला मिळाले. मात्र त्यांच्या कुटुंबातील इतर व्यक्तींबाबत काहीच माहिती पुढे आली नाही. बाबांची पत्नीही या सर्व प्रक्रियेत कुठेच नव्हती. फारच कमी लोकांना त्याबाबत माहिती आहे. पाहूया काय आहे बाबांची कौटुंबिक पार्श्वभूमी…
बाबा राम रहिम हे त्यांच्या आई-वडिलांचे एकुलते एक पुत्र आहेत. त्यांच्या जन्माआधी त्यांच्या आईने एका मुलीला जन्म दिला होता. मात्र तिचा अल्पावधीतच मृत्यू झाला. राम रहिम यांनी ९ वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांचे हरजीत सिंह यांच्याबरोबर लग्न झाले. त्यांना जसमीत नावाचा एक मुलगा आणि चरणप्रीत आणि अमरप्रीत अशा दोन मुली आहेत. त्यांची पत्नी आश्रमात राहत नाही आणि सार्वजनिक ठिकाणीही फारशी दिसत नाही.
यानंतर बाबा रहिम यांनी तिसऱ्या मुलीला दत्तक घेतले. या मुलीचे खरे नाव प्रियांका असून त्यांनी तिचे नाव बदलून हनीप्रीत ठेवले. ती बाबांबरोबर वारंवार असल्याचे आपल्याला या प्रकरणादरम्यानही दिसून आले आहे. १९६७ मध्ये राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये जाट शीख कुटुंबात जन्मलेल्या बाबा राम रहिम यांना तेव्हाचे डेरा प्रमुख सतनाम सिंह यांनी २३ सप्टेंबर १९९० मध्ये आपला वारसदार जाहीर केले. त्यानंतर वयाच्या २३ व्या वर्षी बाबा राम रहिम हे डेरा सच्चा सौदाचे प्रमुख झाले. बाबा राम रहिम यांना सिनेमात काम करण्याचाही छंद आहे.