महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे. करोनाच्या निर्बंधांनंतर पहिल्यांदाच भाजपा कार्यकर्त्यांकडून यंदा मोठ्या उत्साहामध्ये फडणवीस यांचा वाढदिवस वेगवेगळ्या समाज उपयोगी कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा केला जात आहे. असं असतानाच दुसरीकडे भाजपाचे विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांनी फडणवीस यांची तुलना थेट भगवान श्री रामासोबत केली आहे. वाढदिवसानिमित्त फडणवीस यांना शुभेच्छा देताना लाड यांनी ही तुलना केलीय.
नक्की पाहा >> Photos: एक कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणातील वादग्रस्त अधिकारी होणार CM शिंदेंचा सल्लागार? सेवानिवृत्तीनंतर ७ वेळा मिळाली मुदतवाढ
प्रसाद लाड यांनी ट्वीटरवरुन फडणवीसांसोबतचा एक फोटो पोस्ट केलाय. या फोटोमध्ये लाड हे फडणवीस यांचा सत्कार करताना दिसत आहेत. फडणवीस यांच्या खांद्यावर भगवी शाल असून लाड हे त्यांना प्रभू श्रीराम आणि भगवान हनुमान यांच्या गळाभेटीची प्रतिमा भेट देताना दिसत आहेत. हा फोटो शेअर करताना लाड यांनी फडणवीस हे आपल्याला प्रभू रामाप्रमाणे असून आपण हनुमान आहोत असं म्हटलंय. आपण त्यांच्याशिवाय अपूर्ण असल्याचा उल्लेखही लाड यांनी पोस्टमध्ये केलाय.
नक्की वाचा >> नेमकं राष्ट्रपती कोण झालंय? मुर्मू यांचं अभिनंदन करणारी मुख्यमंत्री शिंदेंची पोस्ट पाहून लोकांना पडला प्रश्न; फोटो ठरतोय चर्चेचा विषय
“मी भगवान श्रीरामाला नमन करतो. ज्याप्रमाणे भगवान हनुमान श्रीरामांशिवाय अपूर्ण आहेत त्याप्रमाणेच माझी स्थिती आहे,” असं फडणवीसांसोबतच्या फोटोला कॅप्शन देताना लाड यांनी म्हटलंय.”मी माझ्या भगवान श्रीरामाच्या वाढदिवसानिमित्त त्यांना दिर्घायुष्य लाभो यासाठी प्रार्थना करतो,” असंही त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटलंय. जय श्री राम, जय बजरंगबली तसेच देवेंद्रजी वाढदिवसाच्या शुभेच्छा असा उल्लेखही या ट्वीटच्या कॅप्शनमध्ये आहे.
नक्की वाचा >> …अन् अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घरासमोर आदित्य ठाकरेंचा ताफा थांबला
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना खासदार प्रफुल्ल पटेल, अजित पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील या नेत्यांच्या मर्जीतील नेता असलेल्या लाड यांनी भाजपमध्ये आल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही विश्वास संपादन केला. लाड हे नेहमीच फडणवीस यांच्याबरोबर असतात आणि त्यांनी दिलेल्या पक्षाच्या महत्त्वाच्या व नाजूक जबाबदाऱ्याही सांभाळतात. महत्त्वाच्या राजकीय घडामोडींमध्ये व निवडणूक काळात आमदारांच्या भेटीगाठी घेणे, पंचतारांकित हॉटेल्स किंवा अन्य राज्यांमध्ये त्यांची व्यवस्था करणे, अशी महत्त्वाची कामेही त्यांनी हाताळली आहेत. त्यामुळे भाजपमध्ये आल्यावर अल्पावधीतच ज्येष्ठ व जुन्या नेत्यांना डावलून विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीची उमेदवारी २०१७ मध्येच मिळविलेले प्रसाद लाड हे नेहमीच राजकीय वर्तुळात चर्चेत राहिले आहेत. यंदाच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये फडणवीस यांनी प्रसाद लाड यांना पाचव्या क्रमांकाची उमेदवारी देऊन इतर पक्षांकडून मतांची जुळवाजुळव करून निवडून आणलं.