Devendra Fadnavis Coldplay Mumbai Concert Tickets : कोल्डप्ले हा जगभरात नावाजला गेलेला म्युझिक बँड जानेवारी २०२५ मध्ये नवी मुंबईतील डी. वाय. पाटील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्डेडियमवर त्यांचा कार्यक्रम सादर करणार आहे. “म्युझिक ऑफ दी स्फीअर्स वर्ल्ड टूर २०२५” असं या कार्यक्रमाचं नाव आहे. या कार्यक्रमाच्या तिकीटांची ऑनलाईन विक्री सुरू केल्यानंतर अवघ्या काही मिनिटात सर्व तिकीटं विकली गेली. या कार्यक्रमाच्या तिकीटासाठी चाहत्यांनी तब्बल ३ लाखांपर्यंतची रक्कम मोजली. तर व्हीआयपी तिकीटांसाठी ५ लाखांहून अधिक रक्कम मोजल्याचं पाहायला मिळालं आहे. दरम्यान, या कार्यक्रमाच्या तिकीटांची काळ्या बाजारात विक्री झाल्याचं पाहायला मिळालं आहे. पोलिसांनी याप्रकरणी काही लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच ज्या ऑनलाईन संकेतस्थळावरून कोल्डप्लेच्या तिकीटांची विक्री केली जात होती. ते संकेतस्थळही संशयाच्या फेऱ्यात अडकलं आहे. अशातच या कार्यक्रमाचं आयोजन, नवी मुंबईतील वाहतूक व्यवस्था हे येथील सरकारसमोरचं आव्हान आहे. त्यातच सरकारमधील लोकांना या कार्यक्रमाची तिकीटं मिळाली असतील असं काही लोकांना वाटतं. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “राज्याचा गृहमंत्री असल्यामुळे माझ्यासमोर अनेक अडचणी आहेत. त्यासह कोल्डप्लेच्या तिकीटांमुळे वेगळीच अडचण निर्माण झाली आहे. मी सर्वांना सांगू इच्छितो की मला या कार्यक्रमाची तिकीटं मिळालेली नाहीत. त्यामुळे कोणीही माझ्याकडे कोल्डप्लेची तिकीटं मागू नका”. देवेंद्र फडणवीस हे सीएनएन न्यूज १८ टाउन हॉलमध्ये सहभागी झाले होते. यावेळी मुलाखतकाराने त्यांना कोल्डप्लेच्या तिकीटांवरून प्रश्न विचारल्यानंतर फडणवीसांनी त्यावर सविस्तर उत्तर दिलं.
हे ही वाचा >> मुंबई सोडा, एवढ्या पैशात तर थेट अबू धाबीला जाऊन कोल्डप्लेचा शो पाहून याल! ३ लाखांच्या तिकिटाची चर्चा!
फडणवीस नेमकं काय म्हणाले?
कोल्डप्लेचा कार्यक्रम महाराष्ट्रात होतोय. मात्र या कार्यक्रमाची तिकीटं न मिळाल्यामुळे कोल्डप्लेचे चाहते नाराज झाले आहेत. त्यावर काय सांगाल? असा प्रश्न फडणवीस यांना विचारण्यात आला. त्यावर फडणवीस म्हणाले, “कोल्डप्ले हा असा कार्यक्रम आहे की एकाच वेळी पाच क्रिकेट स्टेडियमवर हा कार्यक्रम आयोजित केला गेला तरी तिकीटं कमी पडतील. महाराष्ट्राचा गृहमंत्री म्हणून माझ्यासमोर अनेक अडचणी आहेत. त्यातच माझ्यासमोर एक नवी अडचण उभी राहिली आहे. काही लोकांना वाटतंय की मी महाराष्ट्राचा गृहमंत्री असल्यामुळे मला या कार्यक्रमाची तिकीटं मिळाली असतील. लोकांना असं वाटतंय ही माझ्यासमोरची अडचण आहे. परंतु, बरं झालं की तुम्ही हा प्रश्न विचारलात. मी एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीवरून लोकांना सांगू इच्छितो की माझा कोल्डप्लेच्या कार्यक्रमाशी काहीच संबंध नाही. मला या कार्यक्रमाची तिकीटं मिळत नाहीत. त्यामुळे कोणीही कोल्डप्लेच्या तिकीटासाठी माझ्यामागे लागू नका”.