राज्यसभेच्या निवडणुकीप्रमाणे विधानपरिषदेलाही महाविकास आघाडी आणि भाजपामध्ये काँटे की टक्कर होणार हे स्पष्टचं आहे. त्यामुळेच आज सकाळी नऊ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाल्यानंतरच विधानभवन परिसरामध्ये कुचबूज, चर्चा आणि राजकीय समिकरणांची बेरीज-वजाबाकी सुरु आहे. असं असतानाच विधान भवनाच्या लॉबीमध्ये राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस भाजपा आमदारांच्या गटासोबत चालत असतानाच समोरुन येणाऱ्या काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि सतेज पाटलांना पाहून म्हणतात, “आम्हाला कळलंय काँग्रेसचे तीन मतदार फुटले…”

एकीकडे प्रत्येक मतासाठी सत्ताधारी आणि विरोधक संघर्ष करत असतानाच दुसरीकडे आज सकाळी साडेअकराच्या सुमारास विधानभवानामध्ये खरोखर हे चित्र पहायला मिळालं. दोन्हीकडून विजयाचे दावे केले जात आहेत. मात्र ऐनवेळी काही मतं फिरली तरी निकाल पालटू शकतो याची सर्वांनाच जाणीव आहे. त्यामुळे प्रत्येक आमदारावर मागील काही दिवसांपासून लक्ष ठेवलं जात होतं. शिवाय आजही विधानभवनाच्या परिसरामध्ये नेते मंडळी आणि मंत्री आमदारांना मतदानासंदर्भातील सूचनांबरोबरच सल्लेही देताना दिसत आहेत. एकंदरितच विधानसभेच्या आवारामध्ये आज सकाळपासूनच तणावपूर्ण वातावरण आणि मतदानासंदर्भातील उत्सुकतेमुळे एक प्रकारची शांतता प्राकर्षाने जाणवत होती. मात्र एका क्षणी विधानसभेच्या लॉबीमध्ये भाजपा आणि काँग्रेसचे आमदार समोरसमोर उभे ठाकले आणि फडणवीसांनी ही संधी साधत एक भन्नाट शाब्दिक फटका लगावला. विशेष म्हणजे यावर काँग्रेसच्या आमदारांनीही तितकेच भन्नाट उत्तरं दिले.

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे या निवडणुकीतील उमेदवार असणाऱ्या प्रवीण दरेकर, प्रशांत बंब या आमदारांसहीत लॉबीमधून चालत होते. त्याचवेळी समोरुन काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि सतेज पाटील आले. विरोधी पक्षातील आमदारांना समोरुन येताना पाहून फडणवीसांनी एक मजेदार वक्तव्य केलं. हात जोडून काँग्रेसच्या तिन्ही आमदारांकडे पाहत फडणवीसांनी, “आम्हाला कळलं तीन मतदार फुटले” असं म्हटलं. फडणवीसांचं हे वाक्य ऐकून थोरात, चव्हाण आणि पाटील हसू लागले. पाटील यांनी लगेच तो मी नव्हेच म्हटलं. त्यावर फडणवीसांनी, “अरे हा, तो नाही,” असं म्हणत उत्तर दिलं आणि पाटील यांची पाठ थोपटली आणि सारेचजण हसू लागले. सध्या या साऱ्या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. अनेक मराठी वृत्तवाहिन्यांवरही या लॉबीमधील गप्पा सकाळपासूनच चर्चेचा विषय ठरत आहे.

दहा जागांसाठी ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयासाठी ८-९ मतांची गरज आहे तर भाजपाला २० मतांची गरज आहे. अपक्ष उमेदवारांच्या जोरावर आपणच बाजी मारु असा दावा दोन्हीकडून केला जातोय.