गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेले राजकीय नाट्य काल थांबले आहे. एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तर उपमुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांची वर्णा लावण्यात आली. गुरुवारी सायंकाळी राजभवनात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी पार पडला. यानंतर आता महाराष्ट्रातला सत्तासंघर्ष संपल्याची चिन्हे दिसत आहेत.
उद्धव ठाकरे यांनी बुधवारी २९ जूनला रात्री फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. ‘नंबर्स गेम’मध्ये आपल्याला स्वारस्य नाही आणि म्हणूनच आपण आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. यानंतर भाजपाकडून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी देवेंद्र फडणवीस हे आगामी मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असतील, अशी चर्चा रंगली होती.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांचा हा व्हिडीओ १ डिसेंबर २०१९ चा आहे, जेव्हा ते विधानसभेत म्हणाले होते, ‘मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे पर घर मत बसा लेना, मैं समंदर हूं, लौट कर वापस आऊंगा…’
एकनाथ शिंदे हे गुरुवारी दुपारी गोव्यातून मुंबईत परतले. शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला. त्यावेळी फडणवीस हे मुख्यमंत्री होणार आणि रात्री शपथ घेणार, असेच चित्र होते. राज्यपालांच्या भेटीनंतर फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत मात्र एकनाथ शिंदे हे रात्री मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, असे जाहीर केले. त्यावेळी नाट्यमय घडामोडींचा पहिला अंक पाहायला मिळाला. आपण सरकारमध्ये सहभागी होणार नाही, पण सरकार योग्यपणे चालेल ही जबाबदारी माझी असेल, असे फडणवीस यांनी सांगितले.