Uttar Pradesh Banke Bihari Mandir Video: वृंदावनच्या बांके बिहारी मंदिरातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामध्ये काही भाविक मंदिराच्या मागील भागातील हत्तीमुखातून टपकणारे पाणी हे ठाकूरजींचे चरणामृत समजून पिताना दिसत आहेत. खरे तर ते पाणी चरणामृत नाही, तर मंदिरात लावलेल्या एसीमधून सोडलेले पाणी आहे. यावेळी एक यूट्यूबर भाविकांना ते चरणामृत नसून एसीचे पाणी असल्याचे सांगतो; पण तिथे उपस्थित लोक काही ऐकण्यास तयार नव्हते. त्यामुळे यूट्यूबरने त्याचा व्हिडीओ बनवला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला. लोक हे पाणी कप आणि इतर भांड्यामध्ये गोळा करून घेऊन जातानाही दिसतायत.
मंदिरात चरणामृत समजून भाविक पित होते एसीचे पाणी
वृंदावनमध्ये असलेले बांके बिहारी यांचे एक खूप जुने मंदिर आहे. या मंदिराच्या पहिल्या मजल्यावर पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी हत्तीमुखाच्या आकाराचा एक मार्ग आहे. मंदिरात बसवलेल्या एसीतून सोडणारे पाणीही या मार्गातून बाहेर सोडले जाते. असे सांगितले जात आहे की, काही दिवसांपूर्वी एका भक्ताने हत्तीमुखातून टपकणारे पाणी ठाकूर बांके बिहारी यांचे चरणामृत समजून हातात घेतले आणि नामजप करण्यास सुरुवात केली. त्याला पाहून इतर भाविकही तसेच करू लागले. तेव्हापासून ती परंपरा बनली. त्यामुळे आता जे कोणी भाविक मंदिरात येतात, ते हे पाणी चरणामृत समजून प्लास्टिकच्या ग्लासात भरून पितात. हे चरणामृत घेण्यासाठी येथे लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळते. काही भाविक तर कप, ग्लास किंवा इतर भांड्यात ते पाणी गोळा करतात आणि ते पाणी घरी घेऊन जात आहेत. यावेळी अनेक लोकांनी भाविकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; पण तरीही भाविक ऐकण्यास तयार नाहीत.
ऑन ड्युटी महिला पोलिस अधिकाऱ्याने मर्यादा ओलांडली, मान धरली, किस केलं अन्…; लज्जास्पद Video व्हायरल
पुजाऱ्यांचे ‘असे’ न करण्याचे आवाहन
हा व्हिडीओ समोर आल्यानंतर बांके बिहारी मंदिराच्या पुजाऱ्यांनी भाविकांना तसे न करण्याचे आवाहन केले आहे. सोशल मीडियावर अनेक जण याला भाविकांची आंधळी भक्ती, असे म्हणत आहेत. मथुरा आणि वृंदावनमध्ये दररोज १० ते १५ हजार पर्यटक देश आणि जगभरातून येतात. येथील मंदिरांमध्ये सकाळपासून रात्रीपर्यंत गर्दी असते. सण किंवा विशेष प्रसंगी एवढी गर्दी असते की, स्थानिकांना गैरसोईंचा सामना करावा लागतो.