Student Died during Farewell Speech Video: देशात अनेक वर्षांपासून हृदयविकाराच्या झटक्यानं होणाऱ्या मृत्यूंच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या हृदयविकाराच्या झटक्यानं तरुण आणि मुलांसह अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलदेखील झाले आहेत. सध्या अशीच घटना धाराशिव येथील महाविद्यालयाच्या निरोप समारंभात घडली. ज्यात एका विद्यार्थिनीने भाषणादरम्यानच आपले प्राण सोडले. धाराशिव जिल्ह्यात घडलेल्या या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.
विद्यार्थीनीचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल (Female Student Died during Farewell Speech)
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या धक्कादायक व्हिडीओमध्ये एक विद्यार्थीनी अगदी हसत खेळत महाविद्यालयाच्या निरोप समारंभात भाषण देताना दिसत आहे. परंतु, काळाने तिचा घात केला. भाषण देता देता अचानक ती स्टेजवरून खाली कोसळली. परंडा धाराशिव शिंदे महाविद्यालयात ही विद्यार्थीनी शिकत असल्याचे वृत्त आहे.
वर्षा खरात असे या विद्यार्थिनीचे नाव असून ती बीएससीच्या वर्गात शिक्षण घेत होती. कार्यक्रमादरम्यान वर्षा स्टेजवर भाषण करत होती. भाषण करत असताना अचानकच तिला भोवळ आली आणि खाली ती कोसळली. तातडीने तिला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. प्राथमिक माहितीनुसार, वर्षाच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचे असू शकते, मात्र अद्याप स्पष्ट कारण समोर आलेले नाही.
विशेष म्हणजे, कार्यक्रमाच्या शेवटी बोलताना वर्षा म्हणाली होती, “प्रत्येक जण आपापल्या परीने जेवढं जमेल तेवढं शिकतो,” असं ती म्हणाली त्यानंतर ती विनोद करत वर्गाला हसवलं होती. काही क्षणातच तिच्या आयुष्याचा असा शेवट झाला.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @marathwada_marathi_news या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून याला “कशी लागली काळाची चाहूल” अशी कॅप्शन देण्यात आलेली आहे. तसंच या कॅप्शनमध्ये पुढे “धाराशिवची विद्यार्थिनी निरोप समारंभात मनसोक्त भाषण करताना स्टेजवरच कोसळली, हॉर्ट अटॅकमुळे घेतला कायमचा निरोप” असंही लिहिण्यात आलेलं आहे. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच याला ५३ लाखांहून अधिक व्ह्यूज आले आहेत.
युजर्सच्या प्रतिक्रिया
विद्यार्थीनिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “धर्मापेक्षा निसर्ग सर्वांचा बाप आहे, तो वेळोवेळी हेच सांगत असतो. एखाद्या चांगल्या व्यक्तीला क्षणात उचलेल.. भावपूर्ण श्रद्धांजली” तर दुसऱ्याने “नशिबापुढे कोणाचंही चालत नाही” अशी कमेंट केली.