Nana Patole Fact Check Video : लाइटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडियावर महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांचा ३५ सेकंदांचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होत असताना आढळून आला. या व्हिडीओमध्ये आरक्षणाबाबत काँग्रेसची भूमिका स्पष्ट करण्यात आली असून, काँग्रेस आरक्षणाच्या विरोधात असल्याचा दावा केला जात आहे. या व्हिडीओची आता राजकीय वर्तुळात खूप चर्चा रंगतेय. पण, खरंच काँग्रेसने अशी कोणती भूमिका मांडली आहे का? तसेच याबाबतचे नाना पटोले यांनी कोणते विधान केले आहे, याबाबतची सत्यता जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. तेव्हा आरक्षणासंदर्भात नाना पटोलेंच्या नावे व्हायरल होणाऱ्या व्हिडीओतून एक वेगळंच सत्य समोर आलं, ते नेमकं काय आहे सविस्तर जाणून घेऊ…
काय होत आहे व्हायरल?
एक्स युजर अनंत कुलकर्णीने व्हिडीओ शेअर करून भ्रामक दावा केला आहे.
इतर युजर्सदेखील दिशाभूल करणारा दावा करून, व्हिडीओ शेअर करीत आहेत.
तपास :
आम्ही व्हिडीओवरून मिळविलेल्या कीफ्रेमवर रिव्हर्स इमेज सर्च चालवून तपास सुरू केला. या व्हिडीओत ज्या माइकचा वापर केला होता, त्यावर ‘इंडिया टीव्ही’ असे लिहिलेले होते.
यावेळी आम्हाला INDIA TV च्या एका बातमीत व्हिडीओचा स्क्रीनशॉट मिळाला.
https://www.indiatvnews.com/maharashtra/india-tv-chunav-manch-maharashtra-assembly-elections-2024-nana-patole-bjp-congress-alliance-pm-modi-cm-eknath-updates-2024- 10-24-958750
या बातमीत व्हिडीओही पाहायला मिळाला.
हा व्हिडीओ चार दिवसांपूर्वी INDIA TV च्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करण्यात आला होता.
व्हिडीओमध्ये सुमारे १३ मिनिटे ३९ सेकंदांच्या टाईमवर आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा होताना दिसतेय. यावेळी एका अँकरने त्यांच्या आणि राहुल गांधींच्या आरक्षणावरच्या विधानाबद्दल विचारलं.
ज्यावर नाना पटोले यांनी म्हटले की, राहुल गांधी काय म्हणाले, जेव्हा आपल्या देशात सर्व समान असतील, तेव्हा आरक्षणाचा विचार करू, त्यात गैर काय, डॉ. बी. आर. आंबेडकर यांनीही तीच भूमिका ठेवली; पण ज्यांना इंग्रजी समजत नाही ते ही विधाने खोट्या दाव्यासह शेअर करीत आहेत.
पुढे अँकरने विचारले की, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण कोणीही संपवू शकत नाही, अशी हमी दिली आहे. त्यावर पटोले यांनी उत्तर दिले की, आज शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण नाही, ते (भाजपा) फक्त गोष्टी बोलून दाखवतात. शैक्षणिक आणि रोजगाराच्या बाबतीत त्यांनी देशाला कमकुवत करायला सुरुवात केली आहे. हेच अपूर्ण विधान व्हायरल व्हिडीओमध्ये दाखविण्यात आले आहे.
पक्ष आरक्षणविरोधी भूमिका घेत आहे की नाही हे पाहण्यासाठी आम्ही काँग्रेसचा जाहीरनामाही तपासला. आम्हाला त्या जाहीरनाम्यात SC, ST व OBC साठी आरक्षणावर ५० टक्के मर्यादा आणि नोकऱ्या व शिक्षणातील आरक्षण यावरील २३ इतर मुद्दे आढळले.
निष्कर्ष : काँग्रेस पक्षाची आरक्षणविरोधी भूमिका मांडण्यासाठी एका टीव्ही मुलाखतीदरम्यानचा नाना पटोले यांच्या विधानांचा एक एडिट केलेला व्हिडीओ व्हायरल केला जात आहे. तसेच यातून काँग्रेस आरक्षणाच्या विरोधात असल्याचे भासवले जात आहे. नाना पटोले किंवा कोणत्याच काँग्रेस नेत्याने अशी भूमिका मांडलेली नाही. त्यामुळे व्हायरल होणारा हा दावा पूर्णपणे खोटा आणि दिशाभूल करणारा आहे.