इंडिया टुडे: तमिळनाडूमधील एका पाणीपुरी विक्रेत्याने ऑनलाइन पेमेंटद्वारे २०२३-२४ या आर्थिक वर्षात ४० लाख रुपये कमावल्याने त्याला GST नोटीस पाठवण्यात आल्याचा दावा करणारा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण, हा दावा खोटा असल्याचे समोर आले आहे. या दाव्याची सत्यता ‘इंडिया टुडे टीव्ही’ने तपासली आहे; ज्यामध्ये असे आढळून आले की, “ती प्रत्यक्षात एका हॉटेल विक्रेत्याला जारी केली गेली होती आणि त्यातील पत्ता बदलण्यात आला होता.
“तमिळनाडू जीएसटी विभागाच्या एका सूत्राने स्पष्ट केले की, नोटीसचा चुकीचा अर्थ लावला गेला आहे. विक्रेत्याने जीएसटी फ्रेमवर्क अंतर्गत त्यांच्या व्यवसायाची औपचारिक नोंदणी करण्यासाठी नोंदणी प्रमाणपत्र आणि जीएसटी क्रमांक प्राप्त करण्यासाठी केवळ एक रिमाईंडर आहे, ज्याच्याशी विक्रेता सहमत आहे.”
स्टॅण्ड-अप कॉमेडियन जगदीश चतुर्वेदी यांनी त्याचा एक फोटो ट्वीट केल्यानंतर ही नोटीस व्हायरल झाली आणि लिहिले, “पाणीपुरीवाला वर्षाला ४० लाख कमावतो आणि त्याला आयकर विभागाने नोटीस पाठवली.” या ट्वीटमुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आणि अनेकांनी त्यांच्या वार्षिक कमाईची विनोदीपणे तुलना केली.
वृत्तानुसार, विक्रेत्याला तामिळनाडू वस्तू आणि सेवा कर कायदा आणि केंद्रीय GST कायद्याच्या कलम ७० अंतर्गत १७ डिसेंबर रोजी समन्स बजावण्यात आले होते. GST नियमानुसार, वर्षाला ४० लाखांपेक्षा जास्त कमाई करणाऱ्या व्यवसायाची नोंदणी करून कर भरला पाहिजे.
नोटीसमध्ये म्हटले आहे की, “विक्रेत्याला समन्स बजावण्यात आले आणि त्याच्या गेल्या तीन वर्षांच्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित आर्थिक कागदपत्रे सादर करण्यास सांगितले. ४० लाख रुपयांची वार्षिक उलाढाल असतानाही जीएसटी नोंदणीशिवाय सेवा देणे किंवा वस्तूंचा पुरवठा करणे हा गुन्हा आहे” असेही त्यात म्हटले आहे.
इंडिया टुडेने जीएसटी नोटीसची सत्यता तपासली आणि राज्य जीएसटी विभागाच्या स्रोताशी संपर्क साधला, ज्याने कन्याकुमारी येथील हॉटेल विक्रेत्याला नोटीस जारी केल्याची पुष्टी केली. पण, पत्ता हाताने लिहिलेला असल्याचे आढळले आणि उर्वरित आशय टाईप करण्यात आला होता, असे सूत्राने सांगितले.
विक्रेत्याला नोंदणी प्रमाणपत्र मिळविणे, जीएसटीच्या कक्षेत नोंदणी करणे व जीएसटी क्रमांक मिळवणे या बाबींसाठी सूचित करण्याकरिता नोटीस जारी करण्यात आली होती, ज्याच्याशी विक्रेता सहमत होता. पण, चुकीची माहिती पसरवण्यासाठी काही व्यक्तींनी नोटीसवरील ‘पत्ता’ बदलून, तिचा मूळ हेतू चुकीच्या पद्धतीने मांडला आहे.”
(ही कथा मूलत: ‘इंडिया टुडे’ने प्रकाशित केली आहे आणि ‘शक्ती कलेक्टिव्ह’चा एक भाग म्हणून ‘लोकसत्ता’ याचे भाषांतर करून पुनर्प्रकाशित करीत आहे. https://www.indiatoday.in/india/tamil-nadu/story/panipuri-vendor-gst-notice-lakh-viral-social-media-claim-fact-check-tamil-nadu-2659986-2025-01-05)