लाइटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हायरल पोस्ट सापडली. त्यात रतन टाटा यांनी भारतीय सैन्याला बुलेट प्रूफ बसेस भेट दिल्याचा दावा करण्यात आला होता. आम्ही आमच्या तपासणीत या व्हायरल पोस्टमधील दाव्याचा पर्दाफाश केला असून, तो दावा खोटा असल्याचं समोर आलं आहे.
काय व्हायरल होत आहे?
इन्स्टाग्राम युजर्स आदित्य क्रिएटरने त्याच्या प्रोफाईलवर एक रील पोस्ट केली, ज्यामध्ये रतन टाटा यांनी भारतीय सैन्यासाठी नुकत्याच बुलेट अन् बॉम्ब प्रूफ बस बनवल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले आहेत. इतर युजर्सदेखील हीच पोस्ट मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.
दाव्यामागील सत्याचा शोध कसा लागला?
आम्ही ती पोस्ट रिव्हर्स इमेज सर्चवर टाकली. रिव्हर्स इमेज सर्चद्वारे आम्हाला फेसबुक पोस्ट सापडली. मिधानी समूहाकडून आर्मर्ड बस केंद्रीय राखीव पोलीस दलाला (CRPF) सुपूर्द करण्यात आल्याचे या पोस्टमध्ये सांगण्यात आले आहे.
ही पोस्ट ९ सप्टेंबर २०१७ रोजी करण्यात आली होती. आम्ही X (पूर्वीचे Twitter) वर कीवर्डद्वारे देखील शोध घेण्याचा प्रयत्न केला. यात आम्हाला सीआरपीएफच्या अधिकृत हँडलवर काही पोस्ट सापडल्या. आम्हाला आणखी एक ट्विट सापडले, जे मिधानी ग्रुपच्या सीएमडीने केले होते.
पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, कमी वजनाचे असलेले बुलेट जॅकेट म्हणजेच भाभा कवच मिधानी समूहाकडून सीआरपीएफकडे सुपूर्द केले आहेत. पोस्ट २०१७ मध्ये शेअर केली होती. आम्ही ईमेलद्वारे टाटा ट्रस्टशी संपर्क साधला आहे, आम्हाला तिकडून जो काही प्रतिसाद मिळेल, त्यानंतर फॅक्ट चेकची बातमी अपडेट केली जाणार आहे.
निष्कर्ष: रतन टाटा यांनी भारतीय लष्कराला बुलेट प्रूफ बस भेट दिलेली नाही. व्हायरल झालेला फोटो मिधानी ग्रुपच्या चिलखती बसचा आहे. २०१७ मध्ये मिधानी ग्रुपने आर्मर्ड बस केंद्रीय राखीव पोलीस दलाकडे सुपूर्द केली होती.