‘खुश है जमना
मीठा है खाना
करनो ना बहाना
आज पहिली तारिख है, जी पहिली तारिख है”
तसं महिन्याची पहिली तारीख आली आणि पगार झाला की आपण अनेकदा हे गाणं गुणगुणतो पण १ जूनला गोडधोड खाण्याचं निमित्त मात्र पगार नसतोच. हे कारण काहीतरी वेगळंच आहे. एव्हाना तुमच्या हे कारण लक्षात आलं असेलच. कारण आज तुमच्या ओळखीतल्या किमान पाच एक जणांचा तरी वाढदिवस नक्कीच असेल. फेसबुकवरही १ जूनला वाढदिवस असलेली अनेक मंडळी तुम्हाला दिसतील. काय योगायोग बघ ना आपल्या ओळखीतल्या अनेकांचे वाढदिवस एकाच वेळी असण्याचा दिवस म्हणजे १ जून. तेव्हा तुम्हालाही प्रश्न पडला असेल की एवढी लोक एकाच दिवशी कशी काय जन्माला आली?
वाचा : वर्षभरापूर्वी मृत पावलेल्या भावाला घेऊन ‘तो’ रात्रभर सायकलवरुन हिंडला
तर यामागचं कारण फार काही मोठं नाही. पूर्वी जन्म-मृत्यूची नोंदणी करण्याबाबत एवढी जागरूकता नव्हती. तेव्हा आपलं मुलं कोणत्या दिवशी, कोणत्या तारखेला जन्माला आलंय हे अनेक आई वडिलांच्या लक्षातही नसायचं. तेव्हा आतासारखी रुग्णालयातही बाळंतपण व्हायची नाहीत त्यामुळे जन्मतारीख, वेळ, दिवस यांची नोंदणी ठेवण्याचा प्रश्नच यायचा नाही. पुढे ही मुलं जेव्हा मोठी झाली, शाळेत जाण्याची वेळ आली तेव्हा अनेकांना आपली जन्मतारीखच माहिती नसायची. तेव्हा अशा मुलांना १ जून ही जन्मतारीख देण्यात आली. त्यामुळे शाळेत प्रवेश घेणं अधिक सोपं झालं. काहींचे वडील देखील नोकरी करणारे होतं. त्यामुळे बदल्याही खूप व्हायच्या. या गोंधळात महत्त्वाची कागदपत्रं देखील हरवायची. त्यामुळे मुलांच्या जन्मतारखेची नोंद असलेली कागदपत्रंही सापडायची नाहीत. पुढे इतर शैक्षणिक ठिकाणी किंवा नोकरीच्या ठिकाणी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करताना अडचणी यायच्या. तेव्हा बिचारी ही मुलं कोणत्याही महिन्यात जन्मला का येऊ दे पण सबळ पुरावा नसल्याने त्यांची जन्मतारीख मात्र १ जूनच केली जायची. त्यामुळे सगळ्यांचे वाढदिवस हे १ जूनलाच येतात.