पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मागील सहा वर्षांपासून देशातील सर्वाधिक लोकप्रिय ठरलेले व्यक्ती आहेत. अनेक सर्वेक्षणांसह गत दोन लोकसभा निवडणुकांमधुन हे स्पष्ट देखील झाले आहे. शिवाय सर्वत्र चर्चेतील राजकारणी म्हणुन देखील त्यांची ओळख आहे. असे फार कमी लोक असतील ज्यांना त्यांच्याबाबत माहिती नाही. मात्र तरी देखील बऱ्याच लोकांना हे माहिती नाही की, पंतप्रधान मोदींना शालेय जीवनात असताना अभिनय आणि नाटकाची प्रचंड आवड होती.
मोदींच्या अभिनय आणि रंगमचावरील प्रेमाबाबत एम व्ही कामथ आणि कालिंदी रांडेरी यांनी २०१३ मध्ये प्रकाशित केलेल्या त्यांच्या ‘द मॅन ऑफ द मोमेंट : नरेंद्र मोदी’ या गाजलेल्या चरित्रात उत्तमप्रकारे लिहून ठेलेले आहे. तेव्हा मोदी देशाच्या राजकारणातील उगवते नेते होते. शिवाय मोदींनी देखील त्यांच्या ‘एक्झाम वॉरियर्स’ या पुस्तकात आपल्या अभिनय आणि नाटकांवरील प्रेमाबद्दल लिहिलेले आहे.
पंतप्रधान मोदींना त्यांच्या ‘एक्झाम वॉरियर्स’ या पुस्तकातील एका भागात आपल्या शालेय जीवनातील नाटकाच्या सरावादरम्यान घडलेल्या एका प्रसंगाच्या आठवणींला उजाळा दिला आहे. यात मोदींनी म्हटले आहे की, मला एक विशिष्ट संवाद सादर करायचा होता, ज्यासाठी काही कारणास्तव मी अडखळत होतो. त्यावेळी दिग्दर्शकाचा संयम सुटला होता व त्यांनी मला तुला जर हे नीट बोलता आले नाहीतर, मी तुझ्याबरोबर काम करू शकणार नाही असे म्हटले होते. पण मला तेव्हा वाटत होते की मी उत्तमप्रकारेच संवादफेक करत आहे. त्यामुळे दिग्दर्शक माझ्याबद्दल जे बोलत होते त्याने मी गोंधळलो होतो. दुसऱ्या दिवशी मी दिग्दर्शकास माझ्याप्रमाणे अभिनय करण्यास व मी कुठे चुकतो आहे, हे दाखवण्यास सांगितले. यानंतर काही सेकंदातच मला मी कुठे चुकत होतो ते कळाले व मी माझी चुक सुधारू शकलो.
मोदी जेव्हा साधारण १३ ते १४ वर्षांचे होते तेव्हा त्यांचे जन्मगाव असलेल्या वडनगर येथील त्यांचा शाळेच्या तुटलेल्या संरक्षक भिंतीच्या दुरूस्तीठी शाळेकडे पैसे नव्हते. तेव्हा मोदींनी या कामासाठी निधी गोळा करण्यासाठी देखील नाटक सादर केले होते. मोदींनी व त्यांच्या मित्रांनी शाळेसाठी निधी उभा करण्याचे ठरवले व एक नाटक सादर केले होते. विशेष म्हणजे हे नाटक मोदींनी स्वतः लिहिले, दिग्दर्शित केले व यात अभिनय देखील केला होता. ती एक एकांकिका होती. गुजराती भाषेतील असलेल्या या नाटकाचे नाव ‘पीलू फूल’ म्हणजेच ‘पिवळे फुल’ असे होते. या नाटकाचा विषय अस्पृश्यता असा होता. मोदींनी या विषयावर नाटक सादर केले तेव्हा म्हणजे १९६३ – ६४ च्या कालावधीत अस्पृशता तळागाळापर्यंत रूजलेली होती.
मोदींनी केलेल्या नाटकात दाखवण्यात आले होते की, एका खेडेगावात राहणाऱ्या दलित महिलेचा मुलगा आजारी पडल्याने ती त्याला उपचारांसाठी वैद्य आणि तांत्रिकाकडे घेऊन जाते, मात्र आई व मुलगा दोघेही अस्पृश्य असल्याने त्याच्यावर उपचार करण्यास नकार दिला जातो. मग कुणीतरी त्या महिलेला सुचवतं की, गावातील देवळात असलेल्या देवाला अर्पण केलेल्या पिवळ्या फुलाचा स्पर्श जर तिने तिच्या मुलाला केला तर तो आजारातुन बरा होईल. हे ऐकून ती देवळाकडे धाव घेते मात्र तिथे देखील तिला देवळात येऊ दिले जात नाही. तिथला पुजारी तिच्यावर ओरडतो. तेव्हा ती त्याच्याकडे मुलाचा जीव वाचवण्यासाठी एका पिवळ्या फुलाची भीक मागते. अखेर पुजारी तिला देवाला अर्पण केलेलं ते पिवळ फुल देण्यास तयार होतो. अशाप्रकारे मोदींनी देवासमोर प्रत्येकजण समान आहे व देवळातील देवाला अर्पण केलेल्या फुलांवर प्रत्येकाचा समान अधिकार असल्याचा संदेश देत नाटकाचा शेवट केला होता.
‘द मॅन ऑफ द मोमेंट : नरेंद्र मोदी’ च्या सह लेखिका कालिंदी रांडेरी यांनी एका मुलाखती दरम्यान सांगितले की, त्या जेव्हा पुस्तक प्रकाशनाअगोदर वडनगर येथे अधिक माहिती गोळा करण्यासाठी गेल्या होत्या, तेव्हा त्यांना भेटलेल्यांपैकी अनेकांनी मोदींनी केलेल्या त्या नाटकाची एक अतिशय चांगले लिहिलेले व उत्तम प्रकारे अभिनय केलेले नाटक म्हणुन आठवण काढली होती. असे म्हटले जाते की मोदींचे हे नाटक हे सत्यघटनेवरील आधारित होते.