Woman Washes Hair In Yamuna’s Toxic Foam Video viral : देशभरात सध्या छठ पूजेचा उत्साह पाहायला मिळतोय. विशेषत: उत्तर भारतात हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात. या सणानिमित्त महिला उपवास करतात आणि सूर्यनारायणाची पूजा करतात. या उत्सवानिमित्ताने अनेकांनी दिल्लीतील यमुनेच्या घाटावर पोहोचून स्नान केले. मात्र, दरवर्षीप्रमाणे यंदाही यमुनेत मोठ्या प्रमाणात प्रदूषण पाहायला मिळाले. नदीभोवती घाणीचे ढिगारे अन् विषारी फेस, दुर्गंधी अशी भीषण परिस्थिती आहे. पण, अनेक जण यमुना नदीतील विषारी फेसाकडे दुर्लक्ष करून नदीत उतरताना दिसतात. सध्या सोशल मीडियावरही यमुनेचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे, ज्यात काही महिला यमुनेत डुबकी मारून असा काही किळसवाणा प्रकार करतायत की पाहून कोणालाही घाण वाटेल. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय.
छठपूजेच्या निमित्ताने अनेक भाविक स्नान आणि डुबकी मारण्यासाठी यमुनेच्या काठी पोहोचले. यावेळी यमुनेत मोठ्या प्रमाणात विषारी फेस, दुर्गंधी आणि घाण पाहायला मिळाली, मात्र त्यानंतर अनेक महिला भाविकांनी श्रद्धेपोटी यमुनेत स्नान केले. याच महिलांचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय.
यमुनेच्या विषारी पाण्यात महिलांनी मारल्या डुबक्या अन्…
या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, काही महिला यमुनेच्या विषारी पाण्यात मस्त डुबकी मारत स्नान करतायत. धक्कादायक बाब म्हणजे त्या तेवढ्यावरच थांबल्या नाही, त्यांनी पाण्यावर तरंगणाऱ्या विषारी फेसाने आपले केस धुतले. शॅम्पू असल्याप्रमाणे महिला त्या फेसाने केस धुताना दिसतायत. हा व्हिडीओ पाहून नेटकरी आता डोक्याला हात मारत आहेत; तर अनेक जण अहो ताई, तो शॅम्पू नाहीये म्हणत या महिलांची फिरकी घेत आहेत.
हेही वाचा – “गोवा म्हणजे पर्यटकांना जाळ्यात अडकवण्याचा सापळा”, गोव्यातील पर्यटनावर युजर्सचा संताप; म्हणाले, ‘घाणेरडे…
यमुना नदीतील या धक्कादायक प्रकाराचा व्हिडीओ @mrjethwani_ नावाच्या एक्स अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, जो आता तुफान व्हायरल होतोय. व्हिडीओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये, ‘अहो ताई, तो शॅम्पू नाही’ असे लिहिले आहे. दरम्यान, अनेकांनी व्हिडीओवर कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने म्हटलेय की, काही दिवसांनी त्यांना स्किन डॉक्टरकडे जावे लागू शकते. दुसऱ्या युजरने म्हटलेय की, यामुळे फक्त केसच स्वच्छ होणार नाहीत, डोक्यावरील संपूर्ण केस निघून जातील. काहींनी अशा गोष्टींबाबत लोकांनी अधिक जागरूक असणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे, तर काहींनी दिल्लीतील प्रदूषणाबाबत मोठी चिंता व्यक्त केली आहे.