जग अद्भूत आहे. जगातील अनेक गोष्टी आपल्याला आश्चर्याचा धक्का देतात. त्यातही प्राण्यांच्या जगातील आपण कल्पनाही करु शकणार नाही. ‘नॅशनल जिओग्राफिक’ने प्राणी जगतातील अशाच काही आश्चर्यकारक घटनांची माहिती दिली आहे. यातील काही गोष्टी खास तुमच्या माहितीसाठी…
* ऑस्ट्रिच पक्षी हा सिंहासारखी गर्जना करु शकतो. हा पक्षी दिसतो नाजूक पण त्याची गर्जना सिंहाच्या गर्जनेइतकीच दमदार असते.
* संगीत सुरु असल्यावर गायी जास्त दूध देतात असे एका निरीक्षणामध्ये दिसून आले आहे.
* फुलपाखरे आपल्या पायांच्या तळाशी असलेल्या विशेष पेशींच्या मदतीने एखाद्या गोष्टीची चव घेतात.
* विंचवाचा आणि अल्कोहोल म्हणजेच मद्याचा ३६चा आकडा आहे. एक थेंब मद्य जरी विंचवावर पडले तर तो वेडापिसा होता. इतका की तो स्वत:लाच नांगी मारून स्वत:चा जीव घेऊ शकतो.
* घरात येणाऱ्या माश्या कधीच झोपत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांचे आयुष्यच अवघ्या २८ दिवसांचे असते.
* पाण्यातील कासवांच्या काही प्रजाती त्यांच्या पार्श्वभागाने श्वसन करतात.
* देवमाशाचे हृदय एका मिनिटांमध्ये केवळ ९ वेळा धडधडते.
* डॉल्फिन मासा एक डोळा बंद करुनच झोपतो. झोपेतही त्याच्या मेंदूचा अर्धा भाग कार्यरत असतो.
* नर आणि मादी कुत्र्यांची पिल्ले खेळामध्ये नेहमी मादीला जिंकू देतात.
* प्रत्येक व्यक्तीच्या हाताचे ठसे जसे वेगळे असतात तसेच कुत्र्यांच्या नाकासंदर्भात असते. एका कुत्र्याचे नोज प्रिंट दुसऱ्या कुत्र्याच्या नोज प्रिंट सारखे कधीच नसतात.
* जिराफाचे वय जसजसे वाढत जाते तसे त्याच्या अंगावरचे चट्टेपट्टे काळे होत जातात.
* गोरिला या प्राण्याला माणसांप्रमाणे सर्दी होते.
* चिपांझी आणि मानवाच्या डीएनएमध्ये ९८.४ टक्के साम्य आहे.
* कोळ्याचे जाळे खूप शक्तिशाली असते. एकाच जाडीचे स्टील आणि कोळ्याचे जाळे समप्रमाणातील वजन पेलवू शकते. तसेच कोळ्याचे जाळे त्याच्या दिसणाऱ्या लांबीपेक्षा ३० टक्के लांब ताणले जाऊ शकते.
* मनुष्याला घाम येतो त्याचप्रमाणे गेंड्यांच्या शरीरामधून तेलासारख्या पदार्थ बाहेर येतो. जो सनस्क्रीनसारखा काम करतो आणि त्याचे उष्णतेपासून बचाव करतो.
* जगात मनुष्य आणि मुंग्यांचे प्रमाण एकास दहा लाख इतके आहे. म्हणजेच प्रत्येक एका व्यक्तीमागे जगात दहा लाख मुंग्या आहेत.
* जगातील सर्वात महागड्या कॉफीपैकी एक असणारी कॉफी ही हत्तीच्या शेणापासून बनवतात. हत्तीला अरेबिका नावाच्या कॉफीच्या बिया खायला देऊन ही कॉफी बनवली जाते.
* जन्मानंतर तासाभरात जिराफ आपल्या पायावर उभा राहू शकतो.