आपल्यापैकी अनेकजण छोट्या छोट्या कारणांनी दुखी: होतात. म्हणजे अगदी लहानलहान गोष्टींचा अतीविचार करणारे लोक आपल्याला अनेकदा अवतीभोवती दिसून येतात. मात्र काहीजण याच्या एकदम विरुद्ध असतात. म्हणजे आपल्या आयुष्यातील मोठ्या समस्यांना समोरे जाऊनही ते आपले आयुष्य अगदी आनंदात जगताना दिसतात. अशाच एका व्यक्तीचा व्हिडीओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होताना दिसत आहे. केवळ एक पाय असणारी ही व्यक्ती व्हिडीओमध्ये झिंगाटच्या तालावर नाचताना दिसत आहे.
सोशल मिडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ आहे या रविवारी पुण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या अर्ध-मॅरेथॉननंतरचा आहे. या व्हिडीओत एक दिव्यांग तरुण स्पर्धा पूर्ण केल्याच्या आनंदात ‘सैराट’ सिनेमामधील ‘झिंगाट’ गाण्यावर मनसोक्तपणे नाचताना दिसत आहे. फेसबुक, युट्यूबसारख्या साईटवर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
पुण्यातील अर्ध-मॅरेथॉन ही २५ किलोमीटर, १० किलोमीटर आणि ६ किलोमीटर असा तीन वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आयोजित करण्यात आली होती. त्यापैकी १० किलोमीटरची शर्यत पूर्ण केल्यानंतर हा दिव्यांग तरुण झिंगाटच्या गाण्यावर नाचायला लागला. त्याने केलेल्या स्टेप्सही खऱ्याखुऱ्या झिंगाट गाण्यातील स्टेप्सशी साधर्म्य साधणाऱ्या होत्या हे विशेष.
कोण आहे ही व्यक्ती
द लॉजिकल इंडियन पोस्ट या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार व्हायरल व्हिडीओमध्ये नाचणाऱ्या तरुणाने नाव जावेद रमजान चौधरी असे आहे. २४ वर्षीय जावेद हा मूळचा बुलढण्यातील लोणार येथे राहणारा आहे. जावेद हा प्रोफेश्नल व्हीलचेअर बास्केटबॉल खेळाडू आहे. सध्या तो स्पर्धा परिक्षांची तयारी करत असून अर्ध-मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी पुण्याला आला होता. एक चांगला बास्केटबॉल खेळाडू असण्याबरोबरच जावेद हा एक उत्तम जलतरणपटूही आहे. जावेदचा हा डान्स बघून अनेकांनी जावेदच्या उत्साहाला आणि जीवनाकडे पाहण्याच्या सकारात्मक दृष्टीकोनाला सलाम केला आहे.