मागील काही दिवसांपासून काश्मिरमधील तणावस्थितीमध्ये वाढ होत असतानाच तेथील नागरीक अतिशय भितीच्या वातावरणात जगत आहेत. याठिकाणी झालेल्या एका घटनेमध्ये एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांचा अनंतनाग येथे मृत्यू झाला. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये हे पोलीस उपनिरीक्षक शहीद झाले. मेहंदी कडाल या भागात अतिरेक्यांनी हल्ला केला त्यावेळी अब्दुल रशीद यांच्याकडे कोणतेही शस्त्र नव्हते त्यामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला.

दक्षिण काश्मिरच्या पोलीस महानिरीक्षकांकडून रशीद यांची मुलगी झोहरा हिच्यासाठी एक पत्र लिहीले आहे. यामध्ये परिस्थिती, पोलीस दलाचा सहभाग आणि पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांचे स्थान सांगणारे हे पत्र अतिशय बोलके आहे.  शोकसभेच्या वेळी हे भावनिक पत्र झोहराला देण्यात आले. पोलिस महानिरीक्षकांच्या अधिकृत फेसबुक पेजवरही हे पत्र शेअर करण्यात आले आहे. अतिशय कमी कालावधीत या पोस्टला २५०० लाईक्स मिळाले असून १ हजारहून अधिक जणांनी ती शेअर केली आहे.

ते लिहीतात, झोहरा तुझे वडिल कोणत्या कारणामुळे गेले याची तुला कल्पना आहेच. अशाप्रकारे हल्ला करणारे लोक हे माणूसकीचे शत्रू असतात. तुझ्या वडिलांनी  जम्मू-काश्मिरमधील पोलीस दलाचे प्रतिनिधित्व केले आहे. अशाप्रकारे आपल्या प्राणाची आहुती देणारे पोलिस हे पोलिस दलासाठी आणि देशासाठी अभिमानाची बाब असेल तरीही त्यांच्या कुटुंबियांसाठी हा अर्थातच मोठा आघात आहे. आतापर्यंत अशापद्धतीने हुतात्मा झालेले पोलीस आणि त्यांची कुटुंबे जम्मू-काश्मिर पोलिस दलाचा महत्त्वाचा भाग आहेत.  पुढे ते म्हणतात, तुझ्या डोळ्यातील प्रत्येक अश्रू आमच्यातील प्रत्येकाचे हृदय हेलावून टाकणारा आहे. ईश्वर आपल्या सगळ्यांना परिस्थितीशी सामना करण्याची आणि आपले कर्तव्य चोख बजावण्याची शक्ती देवो हीच प्रार्थना.

Story img Loader