Digital Arrest Video : देशात सायबर गुन्हेगारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतेय. अनेक लोक या सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात सहजपणे अडकताना दिसतायत. त्यामुळे प्रोत्साहित झालेले स्कॅमर किंवा सायबर गुन्हेगार अधिकाधिक लोकांना यात अडकवण्यासाठी रोज नवनवीन युक्त्या लढविताना दिसतात. दरम्यान, केरळमधील त्रिशूर येथे सायबर गुन्हेगारीची अशीच एक घटना घडली, ज्यात एका स्कॅमरने नकली पोलीस अधिकारी बनून थेट खऱ्या पोलीस अधिकाऱ्याला व्हिडीओ कॉल केला, त्यानंतर जे काही घडले, ते पाहून तुम्हाला हसू आवरणे अवघड होईल. या मजेशीर घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय; जो पाहून युजर्सदेखील खूप मजा घेतायत.
स्कॅमर तुमचीही करु शकतात ‘अशी’ फसवणूक
व्हायरल व्हिडीओमध्ये त्रिशूरच्या पोलीस अधिकाऱ्याने स्कॅमरला ज्या प्रकारे स्वत:च्या युक्तीने अडकवले, ते खूप कौतुकास्पद आहे. या घटनेवरून सर्वसामान्य लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, अनोळखी कॉल्स, मेसेज किंवा व्हिडीओ कॉल लगेच उचलू नका, त्यावर लगेच रिप्लाय करू नका. कारण- स्कॅमर अशा प्रकारे तुमचीही फसवणूक करू शकतात.
पोलीस अधिकाऱ्यानेच केला स्कॅमरचा भांडाफोड
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, त्रिशूर पोलीस अधिकाऱ्याने कॅमेरा ऑन करताच स्कॅमरला समजले की, त्याने कोणती तरी मोठी चूक केली आहे. सायबर सेलच्या अधिकाऱ्याला जेव्हा स्कॅमरचा कॉल आला तेव्हा त्यांनी कॅमेरा बंद केला होता. त्यावर स्कॅमरने विचारले, तू कुठे आहेस? स्कॅमरच्या या प्रश्नावर अधिकाऱ्याने शांतपणे उत्तर दिले, “माझा कॅमेरा नीट काम करीत नाही.”
मात्र, स्कॅमरने वारंवार विनंती केल्यानंतर अधिकाऱ्याने कॅमेरा ऑन केला. पण, जेव्हा स्कॅमरने खऱ्या पोलिसांना समोर पाहिले तेव्हा त्याला खूप घाम फुटला, यावेळी स्कॅमरचा झालेला गेम पाहून खरा पोलीस अधिकारी मात्र जोरजोरात हसू लागला. पण, स्कॅमर नंतर हसत पोलिसांना नमस्कार म्हणू लागला. त्यानंतर सायबर सेलच्या पोलीस अधिकाऱ्याने त्याला म्हटले की, हे सर्व करणे बंद करा. माझ्याकडे तुमच्या लोकेशनसह तुमची संपूर्ण माहिती आहे. त्यामुळे तुम्ही हे काम थांबवणे तुमच्यासाठी फायद्याचे राहील.
स्कॅमर झाला गेम! स्वतःच्याच अडकला पोलिसांच्या जाळ्यात
त्रिशूर शहर पोलिसांनी मंगळवारी इन्स्टाग्रामवर या मजेशीर घटनेचा एक व्हिडीओ शेअर केला; जो आता तुफान व्हायरल होतोय. काही तासांतच या व्हि़डीओला दोन लाखांहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत. त्याच वेळी या पोस्टवर लोकांच्या कमेंट्सचा पूर आला होता. अनेक युजर्सना स्कॅमरचा झालेला हा गेम पाहून हसू आवरणे अवघड झाले, तर अनेकांनी स्कॅमरची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली.