देशाचे माजी पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांची आज पुण्यतिथी आहे. त्यांच्या पुण्यतिथिनिमित्त अनेक नेत्यांनी सोशल नेटवर्किंगवरुन फोटो आणि आदरांजली वाहणाऱ्या पोस्ट केल्या आहेत. मात्र मध्य प्रदेशमधील दोन नेत्यांमध्ये ट्विटवर शाब्दिक बाचाबाची झाल्याचं पहायला मिळालं. सुरुवातीला राज्याचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी एक फोटो पोस्ट केला आणि त्यावर कैलास विजयवर्गीय यांनी उत्तर दिलं.

राज्याचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी एक फोटो ट्विट करत नेहरुंना श्रद्धांजली अर्पण केली. मात्र त्यांनी या फोटोमधून सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यामधील फरक दाखवण्याचा प्रयत्न केला. दिग्विजय यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये माजी पंतप्रधान असणारे नेहरु हे सापेक्षतावादाच्या सिद्धांसाठी ओळखले जाणारे प्रसिद्ध वैज्ञानिक अल्बर्ट आइनस्टाइन यांच्यासोबत दिसत आहेत. तर त्या बाजूला असणाऱ्या फोटोमध्ये पंतप्रधान मोदी हे योगगुरु रामदेव बाबांना मिठी मारताना दिसत आहेत.

नक्की वाचा >> “बाबा रामदेव तर योगाचा कोका कोला”; बिहार भाजपाध्यक्षांची पोस्ट चर्चेत

ट्विटरवर हा फोटो शेअर करताना दिग्विजय सिंह यांनी. “मला काही बोलण्याची गरज नाही. हा फोटो पुरेसा आहे,” अशी कॅप्शन दिलीय.

दिग्विजय सिंह यांचं हे ट्विट व्हायरल झाल्यानंतर त्यावर भाजपाकडूनही रिप्लाय करण्यात आलाय. कैलास विजयवर्गीय यांनी ट्विट करत उत्तर दिलंय. “काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी आज नेहरुंच्या पुण्यतिथीनिमित्त नेहरु आणि मोदींची तुलना केली. दोघेही त्यांच्या काळातील सर्वश्रेष्ठ नेते आहेत. फरक फक्त काम करण्याच्या पद्धतीत आहे. नेहरुंनी कलम ३७० लावून काश्मीरची समस्या निर्माण केली मोदींनी कलम ३७० हटवून काश्मीरच्या समस्येवर तोडगा काढला,” असं विजयवर्गीय यांनी म्हटलं आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर अ‍ॅलोपॅथीबाबत वादग्रस्त विधान करण्यावरुन मागील काही दिवसांपासून योगगुरू रामदेव बाबा चर्चेत आहेत. डॉक्टरांच्या ‘भारतीय वैद्यकीय संघटना’ म्हणजेच आयएमएने रामदेव बाबांविरोधात दंड थोपटले असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलाय. दिग्वज सिंह यांनी थेट कोणतही वक्तव्य केलं न करता फोटोंच्या माध्यमातून मोदी आणि रामदेव बाबांचे चांगले संबंध असल्याचं अधोरेखित करण्याचा प्रयत्न केलाय.