Dil Se Bura Lagta Hai Meme Boy Passed Away: ‘दिल से बुरा लगता है भाई प्लीज भाई’ मीम मुळे चर्चेत आलेला YouTuber देवराज पटेल याचे छत्तीसगडमधील रायपूर येथे एका रस्ते अपघातात निधन झाले आहे. याबाबत छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी स्वतः ट्वीट करून माहिती दिली आहे तसेच देवराजला श्रद्धांजली सुद्धा वाहिली आहे. “एवढ्या लहान वयात अतुलनीय प्रतिभेच्या कलाकाराला गमावणे अत्यंत दुःखद आहे. देव त्यांच्या कुटुंबीयांना आणि प्रियजनांना हे नुकसान सहन करण्याची शक्ती देवो. ओम शांती.” असे बघेल यांनी लिहिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मीडिया रिपोर्ट्सनुसार, देवराज पटेल याचा अपघात लाभांडी चौक परिसरात झाल्याचे समजतेय. याठिकाणी एका अनियंत्रित ट्रकने बाईकला टक्कर दिली आणि त्यातच देवराज पटेलने जीव गमावला. याबाबत माहिती देताना ट्वीटसह मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी देवराजचा एक व्हिडीओ सुद्धा शेअर केला आहे. यामध्ये देवराज पटेल हा छत्तीगड मध्ये दोनच लोक फेमस आहेत एक मी आणि एक म्हणजे आमचे काका असे म्हणताना दिसत आहे.

दरम्यान, मृत्यूच्या काहीच तास आधी देवराज पटेलने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केला होता. प्राप्त माहितीनुसार देवराज रील शूट करण्यासाठी नवे रायपूर येथे आला होता व परतीच्या प्रवासाच्या वेळी हा अपघात घडला. देवराज अवघ्या २१ वर्षाचा होता व सध्या बीएच्या अंतिम वर्षाचे शिक्षण घेत होता.

देवराज पटेल याने भुवन बामच्या ढिंढोरा या सीरीजमध्ये सुद्धा काम केले होते. दिल से बुरा लगता है भाई प्लीज या मीममुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या देवराजचे युट्युबर १ लाखाहून अधिक सबस्क्राइबर्स व ५६ हजाराहून अधिक फॉलोवर्स होते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dil se bura lagta hai meme boy passed away devraj patel death news shared with video by cm bhupesh baghel svs