काहीही घडलं की सोशल मीडियावर लगेच त्या घटनेबद्दल वा विषयाबद्दल ट्रेंड सुरू होतो. आज सकाळपासून #Shivsena हा हॅशटॅग ट्विटरवर टॉप ट्रेंडमध्ये होता. याला कारण ठरलं मुंबईमधील कुर्ला परिसरात शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी एका कंत्राटदाराला कचऱ्याने घातलेली अंघोळ!. हा व्हिडीओ व्हायरल होताच शिवसेनेच्या नावाचा ट्रेंड सुरू झाला.

मुंबईत गेल्या काही दिवसापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचण्याचे प्रकार समोर येत असून, काही ठिकाणी हे पाणी लोकांच्या घरामध्ये शिरल्याच्या देखील घटना घडल्या आहेत. कुर्ला परिसरात पावसाळ्यापूर्वी नालेसफाई पूर्ण न झाल्याने संतप्त झालेल्या आमदार दिलीप लांडे यांनी ठेकेदारालाच नाल्याजवळ बसवून त्याला कचऱ्याने अंघोळ घातली. या घटनेचे पडसाद आज सोशल मीडियावर देखील दिसले आणि शिवसेना ट्विटरच्या टॉप ट्रेंडमध्ये आली.

सोशल मीडियावर या प्रकरणावरुन दोन गट पडल्याचे दिसले. काही लोकांनी आमदार दिलीप लांडे यांनी केलेल्या कारवाईचे समर्थन करत कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांना अशाच प्रकार अद्दल घडवावी, अशी बाजू घेतली. तर काही लोकांनी या प्रकरणावरुन आमदार दिलीप लांडे यांच्यावर टीका करत, अशी गुंडगिरी करण्याची गरज नव्हती असं मत व्यक्त केलं.

हेही वाचा- मुंबई : शिवसेना आमदाराने कंत्राटदाराला कचऱ्यानं घातली आंघोळ

या प्रकरणावर भाष्य करताना आमदार दिलीप लांडे म्हणाले की, “ज्या लोकांनी मला विश्वास दाखवून निवडून दिलं आहे, त्यांचा विश्वास मी कधी तुटू देणार नाही. माझ्या भागात पाणी तुंबले तर मी स्वत: गटारात उतरुन देखील काम करेन. लोकांना कुठला त्रास नको म्हणून मी आणि माझ्या पक्षातील कार्यकर्ते काम करत आहेत,” असं आमदार लांडे यांचं म्हणणं आहे.

आमदार दिलीप लांडे यांनी पावसळ्यापूर्वी एका ठेकेदाराला नालेसफाईचे काम देत ते लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांच्याकडून घेतले होते. मात्र ठेकेदाराने पावसळ्यापूर्वी नालेसफाईचे काम पुर्ण केले नाही. त्यामुळे पावसात रस्त्यावर पाणी तुंबले आणि लोकांच्या घरात देखील शिरले. या गोष्टीमुळे आमदार दिलीप लांडे नाराज झाले आणि त्यांनी ठेकेदारावर शिवसेना स्टाईल अद्दल घडवली. या प्रकरणाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती.