भारतातील अपंगांना सुविधांअभावी दररोज अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. विशेषतः शासकीय कार्यालयात जाताना किंवा प्रवासादरम्यान त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. सध्या मुंबईतील अशाच एका अपंग महिलेला तिच्या स्वत:च्या लग्नासाठी जात असताना किती संकटाचा सामना करावा लागला याबाबतची माहिती तिने ट्विटरवर शेअर केली आहे. या ट्विटमध्ये तिने लग्नाची नोंदणी करण्याचे ऑफिस दुसऱ्या मजल्यावर असल्यामुळे तिला त्या ऑाफिसमध्ये जायला खूप त्रास झाल्याचं सांगितलं आहे. शिवाय सरकारी कार्यालय असतानाही तिथे अपंगांसाठी कोणतीही सुविधा नसल्याचंही तिने सांगितलं आहे.
ही घटना अपंगांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या वीराली मोदी यांच्याबरोबर घडली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं, “मी अपंग असून १६ ऑक्टोबर रोजी मुंबईतील खार येथील निबंधक कार्यालयात माझे लग्न झाले. हे कार्यालय दुसऱ्या मजल्यावर होते, परंतु तिथे जाण्यासाठी लिफ्टची सोय नव्हती. शिवाय माझी सही घेण्यासाठी कोणी खालीही आले नाही, त्यामुळे मला माझ्या लग्नासाठी उंच पायऱ्या चढत वरती जावं लागलं, इतकंच नव्हे तर पायऱ्या चढायला खूप अवघड होत्या आणि त्यांचे रेलिंगही गंजलेले होते. आश्चर्याची बाब म्हणजे मी अपंग असल्याची कल्पना आधी दिली असतानाही मला कोणीही मदत केली नाही आणि कोणत्याही प्रकारची व्यवस्थाही केली नव्हती.”
हेही पाहा- जुगाड करण्याच्या नादात लाखोंची मशीन गेली पाण्यात, बोटीत रोड रोलर चढवतानाचा VIDEO पाहून डोकंच धराल
वीराली मोदी यांनी ट्विट करून दिली माहीती –
वीराली मोदींनी ट्विटच्या माध्यमातून सरकारला आणि सरकारी अधिकाऱ्यांना काही प्रश्न विचारले, त्यांनी लिहिलं, “सुगम्य भारत अभियानाचे काय झाले? मी व्हीलचेअर वापरते म्हणून, मला माझ्या आवडत्या व्यक्तीशी लग्न करण्याचा अधिकार नाही का? कोणी घसरले असते किंवा मी माझ्या लग्नाच्या दिवशी पडले असते तर? याला कोण जबाबदार आहे? माझ्या देशाने माझ्या आणि लाखो अपंग नागरिकांच्या गरजा पूर्ण केल्या पाहिजेत. हे अत्यंत अन्यायकारक आणि अनपेक्षित आहे. ही एक सरकारी इमारत होती.”
वीराली मोदींनी लिहिलेली ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आतापर्यंत ती पोस्ट दहा लाखांहून अधिक लोकांनी पाहिली आहे. तर अनेकजण त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका ट्विटर युजरने लिहिलं, “या सरकारी यंत्रणेला आणि नोकरशाहीला लाज वाटली पाहिजे, जे फक्त भ्रष्टाचार करण्यात व्यस्त आहेत, स्वत:चे खिसे भरत आहेत, त्यांना इतरांच्या दुःखाची कल्पना नाही.” तर दुसऱ्याने लिहिलं, “तुम्हाला लग्नादिवशी ज्या समस्येला सामोरे जावे लागले, ते अत्यंत भयानक आणि दुःखदायक आहे.” तर आणखी एकाने लिहिलं, “सरकारी यंत्रणा जागे व्हा.”