सिनेमा पाहताना एका महिला प्रेक्षकाला उंदीर चावला. त्यानंतर थिएटरच्या मालकाला या महिलेला ६७ हजारांची भरपाई द्यावी लागणार आहे. आसामच्या ग्राहक न्यायालयाने या सिनेमा मालकाला संबंधित महिलेला नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. सिनेमा हॉलमध्ये स्वच्छता राखणं हे सिनेमा हॉलच्या मालकाचं कर्तव्य आहे त्यात कसूर करुन चालणार नाही असं ग्राहक विवाद निवारण आयोगाच्या खंडपीठाने सांगितलं आहे. या खंडपीठीत ए एफ ए बोरा, अर्चना डेका लाखर आणि तुतुमोनी देवा गोस्वामी या सदस्यांचा समावेश होता. तक्रार कर्त्यांच्या साक्षीनुसार थिएटरमध्ये पॉपकॉर्न आणि इतर खाद्यपदार्थ आणि अनेक वस्तू पडल्या होत्या. त्यामुळे उंदीर फिरत होते.
कोर्टाने २५ एप्रिलला या संदर्भातला आदेश आहे. तक्रारदाराच्या साक्षीवरून असं दिसून येतं आहे की प्रत्येक शोनंतर सिनेमा हॉल नियमितपणे साफ केला जात नाही आणि सिनेमा हॉलची सुरक्षा आणि स्वच्छता विषयक स्थिती निश्चित करण्यासाठी कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही.
२०१८ मध्ये घडली होती घटना
२० ऑक्टोबर २०१८ या दिवशी गुवाहाटी या ठिकाणी असलेल्या भानगढ गॅलेरिया या थिएटरमध्ये ही घटना घडली. महिला सिनेमा पाहात असताना तिला उंदीर चावला. सिनेमा सुरु असताना आपल्याला काहीतरी चावलं आहे हे या प्रेक्षक महिलेला समजलं मात्र अंधार असल्याने काय घडलं आहे ते कळलं नाही. तिच्या पायातून रक्त येत होतं. या घटनेनंतर तक्रारदार महिलेला अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं.
महिला प्रेक्षकाने मागितली होती ६ लाखांची नुकसान भरपाई
या महिलेने सिनेमा हॉलच्या मालकाकडे ६ लाखांची भरपाई मागितली होती. मात्र सदर महिलेची तक्रार योग्य नाही असा युक्तीवाद चित्रपटगृहाच्या मालकाच्या बाजूने करण्यात आला. तसंच महिलेवर उपचारही केले असंही थिएटर मालकाने सांगितलं होतं. यानंतर महिलेने हे सांगितलं की जेव्हा ती सिनेमा हॉलच्या मालकाकडे गेली तेव्हा त्याने तिला पुढच्या सिनेमाचे मोफत तिकिट देऊ केले होते. हा सगळा वाद कोर्टात पोहचल्यानंतर आता कोर्टाने थिएटर मालकाला नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला आहे. थिएटर मालकाने ६७ हजारांची नुकसान भरपाई येत्या ४५ दिवसांमध्ये द्यावी असं कोर्टाने स्पष्ट केलं आहे. एवढंच नाही तर ४५ दिवसांमध्ये सदर नुकसान भरपाई दिली नाही तर रक्कम भरेपर्यंत १२ टक्के वार्षिक दराने व्याज द्यावं लागेल असंही स्पष्ट केलं आहे. LiveLaw ने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.