US Ambassador Eric Garcetti Diwali Dance video देशभरात दिवाळी सणाचा उत्साह पाहायला मिळतोय. अगदी गल्लीपासून मोठमोठ्या इमारती सुंदर झगमगत्या लायटिंग्सनी सजल्या आहेत. बाजारपेठांमध्ये शॉपिंगची लगबग सुरू आहे. काही शहरांत सोने-चांदीचे दागिन्यांची खरेदी करण्याचा उत्साह पाहायला मिळतोय. त्यामुळे देशात दिवाळीनिमित्त एक चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. पण, या चैतन्यमय वातावरणाचा केवळ भारतीयच नाही, तर परदेशातील पाहुणेदेखील आनंद घेत आहेत. आज दिल्लीतील अमेरिकन दूतावासात भव्य दिवाळी सेलिब्रेशनचे आयोजन करण्यात आले होते. त्यात अनेकांनी नाचण्याचा आनंद घेतला. या प्रसंगी भारतातील अमेरिकेचे राजदूत एरिक गार्सेटी यांनादेखील नाचण्याचा मोह आवरता आला नाही. एका बॉलीवूड गाण्यावर तेसुद्धा ठेका धरताना दिसले; ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

अमेरिकेचे राजदूत एरिक गार्सेटी त्यांच्याबरोबर एक ग्रुपदेखील नाचत आनंद घेत होता. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो लोक खूप पसंत करीत आहेत.

अमेरिकन राजदूतांचा जबरदस्त दिवाळी डान्स

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अमेरिकेचे राजदूत एरिक गार्सेटी दिल्लीतील यूएस दूतावासात ‘हुसन तेरा तौबा तौबा’ या बॉलीवूड गाण्यावर नाचताना दिसत आहेत. ते इतक्या उत्साहाने तर नाचत होतेच; पण त्यांची प्रत्येक स्टेप एकदम परफेक्ट होती, ज्यामुळे पाहताना त्यांनी अनेक आठवडे या नृत्याचा सराव केला असेल, असे वाटत होते. डोळ्यांवर काळा चष्मा आणि लाल रंगाचा कुर्ता-पायजमा घातलेले एरिक गार्सेटी एकदम भारतीय लूकमध्ये दिसत होते.

यावेळी स्टेजवर त्यांच्याबरोबर एक ग्रुपदेखील डान्स करताना दिसत आहे, जो डान्स स्टेप्समध्ये गार्सेटी यांना फॉलो करीत आहे. यात ते सर्वाधिक पंजाबी डान्सच्या स्टेप्स करताना दिसले. त्यांचा हा डान्स अनेकांना फार आवडला आहे.

विकी कौशलच्या बॅड न्यूज या चित्रपटातील ‘तौबा तौबा’ हे चार्टबस्टर गाणे सोशल मीडियावर तुफान हिट ठरले आहे. चाहत्यांनी या गाण्यातील अनेक डान्स स्टेप्स रिक्रिएट केल्या आणि व्हिडीओज ऑनलाइन शेअर केले. अगदी याच स्टेप्स एरिक गार्सेटी यांनी फॉलो केल्या होत्या.