Pandharpur Wari Video: ‘ज्ञानोबा माऊलींच्या जयघोषात नीरा नदीच्या घाटावर ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना स्नान घालण्यात आले.यावेळी हजारो संख्येने विठूभक्तांनी गर्दी केली होती. नीरा येथे विसावा घेऊन शाही स्नानानंतर मोठ्या आनंदाने भक्तिमय वातावरणात सातारा जिल्ह्यात माउलींच्या पालखीचे स्वागत झाले. भगव्या पताका, टाळ-मृदुंगांचा गजर आणि हरिभजनात तल्लीन होऊन वारकरी नाचत होते. भाविकांच्या प्रचंड उत्साहात माऊलींचा पालखी सोहळा पार पडला यावेळी नीरा नदी काठच्या दत्त मंदिराचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि काही वारकऱ्यांनी लोकसत्ता ऑनलाईनच्या प्रतिनिधी स्नेहा कासुर्डे यांच्याशी संवाद साधला. या नेत्रदीपक सोहळ्याची एक झलक आणि वारकऱ्यांचे अनुभव ऐकुया..

दत्त मंदिराचे अध्यक्ष नितीन काकडे यांनी सांगितल्याप्रमाणे, नीरा नदीच्या काठी हे दत्ताचे जागृत स्थान आहे अशी भाविकांची श्रद्धा आहे. पूर्वीपासून अशी प्रथा आहे की माऊलीच्या पादुका इथे आल्या की या मंदिरातील पुजारी पादुका हाती घेऊन पाच वेळा नीरा नदीच्या पाण्याने त्या धुवायचे. त्यानुसार वर्षानुवर्षे ही प्रथा पाळली जाते. आता मोठ्या स्तरावर व भाविकांच्या गर्दीत हा सोहळा पार पडतो.

तर दत्त मंदिराचे पुजारी सचिन गोडके यांनी सांगितले की, नीरा नदी ही दरवर्षी माउलींच्या पादुकांच्या आगमनाच्या प्रतीक्षेत असते यंदा नीरा स्नान सोहळ्याला वरुण राजाने सुद्धा हजेरी लावली आहे त्यामुळे सोहळ्याची शान आणखीनच वाढली आहे.

दरम्यान, या ठिकाणी उपस्थित वारकरी महिलांनी सुद्धा टाळ्या वाजवत माउलींच्या पादुकांच्या नीरा नदीतील शाही स्नानाचा आनंद साजरा केला. काही महिलांनी आपला वारीचा अनुभव सांगताना आमच्या प्रतिनिधींना सांगितले की, मागच्या २० वर्षांपासून त्या दरवर्षी वारी करत आहेत. अनेकदा पावसापाण्यात चालताना पायाला फोड येतात पण ही माउलींचीच शक्ती आहे जी वारी घडवते. याठिकाणी ज्यांना संपूर्ण वारी करता येत नाही असेही भक्त वारकऱ्यांच्या सेवेसाठी दरवर्षी भेट देतात. नाचत गात आनंद साजरा करण्याचा हा सोहळा खरोखरच महाराष्ट्राची शान आहे हे तुम्हालाही हा व्हिडीओ पाहिल्यावर लक्षात येईलच.

दरम्यान, तुम्हाला हा व्हिडीओ आवडला असल्यास कमेंट्स करून नक्की कळवा. तसेच लोकसत्ता ऑनलाईनच्या युट्युब चॅनेलवर वारीसंबंधित अनेक लहान मोठे क्षण शेअर करणारे व्हिडीओ सुद्धा उपलब्ध आहेत. या माध्यमातून आपण जगाच्या कानाकोपऱ्यात कुठूनही हा वैष्णवांचा मेळा अनुभवू शकता.

Story img Loader