iPhone : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक चर्चा रंगली आहे. ती चर्चा आहे अँड्रॉईड आणि आयफोन यांची. अॅपलचा आयफोन हा स्टेटस सिंबॉल झाला आहे. त्यामुळे तो बाळगणं हे प्रतिष्ठेचं लक्षण मानलं जातं. अँड्रॉईड मोबाइलमध्येही उत्तम फिचर्स असतात. सॅमसंग कंपनीचे S आणि त्यापुढील सीरिजचे फोन हे आयफोनला टक्कर देत आहेत. तरीही एक चर्चा अशी रंगली आहे की कुठल्याही अँड्रॉईड फोनच्या तुलनेत आयफोनवरुन कॅबचं अॅप बुकिंग केल्यास एकाच ठिकाणी जाण्यासाठी टॅक्सी बुकिंगचे दर वाढतात.
नेमकं काय आहे हे निरीक्षण?
आयफोनवरुन तुम्ही ओला किंवा उबर अॅप डाऊनलोड करुन टॅक्सी बुक केलीत तर अँड्रॉईडच्या तुलनेत जास्त पैसे दाखवले जातात. यामध्ये जवळपास ४५ ते ६० रुपयांचा फरक दिसून येतो. चेन्नई या ठिकाणी एक प्रयोग करण्यात आला. ज्या ठिकाणी जायचं आहे तिथे अँड्रॉईड फोनवरुन किती पैसे दाखवतात? तसंच आयफोनवरुन किती पैसे दाखवतात? हे तपासण्यात आलं त्यावेळी भाडं जास्त असल्याचं निरीक्षण समोर आलं.
आयफोनवरुन बुक केलेल्या टॅक्सीचे दर अँड्रॉईडपेक्षा जास्त?
मदीपक्कम ते फिनिक्स मॉल
अँड्रॉईडवरुन बुक केलेल्या कॅबचा दर – १९५ रुपये
आयफोनवरुन बुक केलेल्या कॅबचा दर – २६० रुपये
अवाडी ते चेन्नई विमानतळ
अँड्रॉईडवरुन बुक केलेल्या टॅक्सीचं भाडं- ९६१ रुपये
आयफोनवरुन बुक केलेल्या टॅक्सीचं भाडं – १०१० रुपये
टी नगर ते इगमोर
अँड्रॉईडवरुन बुक केलेल्या टॅक्सीचं भाडं-१८० रुपये
आयफोनवरुन बुक केलेल्या टॅक्सीचं भाडं – ३४४ रुपये
अशी तफावत दिसून आली. या सगळ्यासाठीचा काही ठोस पुरावा मिळालेली नाही. पण कुठेही जायचं असल्यास अँड्रॉईड आणि आयफोनवरुन बुक केलेल्या टॅक्सीच्या दरांमध्ये मोठी तफावत जाणवली हेच यावरुन दिसतं आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे. उबरचं याबाबत असं म्हणणं आहे की ग्राहकाकडे कुठला फोन आहे? यावरुन आमच्या ट्रीप्सचं भाडं ठरत नाही. ज्या ठिकाणी जायचं आहे ते ठिकाण कुठलं आहे? तर ओलाने याबाबत काहीही प्रतिसाद दिलेला नाही. गेल्या काही दिवसांपासून ही चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. या बाबततचा तर्क असा लावला जातो आहे की जेव्हा तुम्ही तुमच्या फोनवर कुठलंही App डाऊनलोड करता तेव्हा तो फोन अँड्रॉईड आहे की iPhone आहे? हे संबंधित कंपन्याना ट्रॅक करता येतं. त्यानुसार भाडेवाढ जास्त दाखवली जाते. मात्र असंच घडतं असा दावा कुणीही केलेला नाही. काहींना स्विगी आणि झोमॅटो अशा फूड अॅपवरही हा अनुभव आला आहे असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.