Viral Video : छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. अनेक शिवप्रेमी महाराजांना मानवंदना देण्यासाठी त्यांच्या गडकिल्ल्यांना भेट देतात. महाराष्ट्रातील गड किल्ले हे महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख आहे. महाराष्ट्रसह देशाच्या कानाकोपऱ्यातील लोक महाराजांच्या गड-किल्ल्यांना भेट देतात सोशल मीडियावर या गड किल्ल्यांवरील फोटो आणि व्हिडिओ शेअर करतात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका अशा गड किल्ल्याविषयी माहिती सांगितली आहे जिथे एकाच ठिकाणी सात वेगवेगळ्या रंगांची माती आढळते. तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा कोणता किल्ला आहे? आज आपण त्याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

व्हायरल होणारा व्हिडिओ हा रायरेश्वर किल्ल्यावरील आहे. या किल्ल्यावर महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली होती. या व्हिडिओमध्ये रायरेश्वर किल्ल्यावरील टेकडीवर एकाच ठिकाणी आढळणाऱ्या सात रंगांच्या माती दाखवल्यात आहेत. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे सात रंग कोणती? तर या टेकडीवर केसरी, गुलाबी, काळा, जांभळा, लाल, पिवळा आणि राखाडी रंगांची माती आढळून येते. या मातीचे छोटे छोटे खडक सुद्धा येथे दिसून येतात.

हेही वाचा : बापरे! बैलाने चक्क माणसांनी भरलेली चारचाकी गाडी उचलली; Video पाहून येईल अंगावर काटा

maharashtra_travel_guide इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये याविषयी सविस्तर माहिती सांगितले. कॅप्शनमध्ये लिहिलेय, “छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या रायरेश्वर किल्ल्यावर स्वराज्याची शपथ घेतली त्या रायरेश्वर किल्ल्याचं एक भौगोलिक वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्यावरील टेकडीवर एकाच ठिकाणी सात वेगवेगळ्या रंगांची माती आढळते. कोट्यवधी वर्षांपूर्वी ज्वालामुखीच्या उद्रेकातून सह्याद्रीची आणि सह्याद्रीतील काळ्या पाषाणाची निर्मिती झाली. पुढे या पाषाणावर निसर्गातील इतर घटकाचा परिणाम होऊन वेगवेगळ्या रंगांचे दगड आणि त्या दगडांपासून माती तयार व्हायला लागली.
पाषाणावर ऊन, वारा, पाऊस या घटकांचा परिणाम होऊन जांभा खडक तयार झाला आणि त्यावर प्रक्रिया होत जाऊन रंगीबेरंगी माती अस्तित्वात आली. मातीचे वेगवेगळ्या रंगांचे थर तर अनेक ठिकाणी दिसून येतात. परंतु सगळे रंग आणि या रंगांच्या वेगवेगळ्या छटा एकाच ठिकाणी आढळणं दुर्मिळ आहे.”

या व्हिडिओवर अनेक युजर्सने प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “गडावर जा, गड पहा गड जगा पण ती माती घरी आणू नका” तर एका युजरने लिहिलेय, “आमचा भोर तालुका आमचा अभिमान.” अनेक युजर्सनी या व्हिडिओवर ‘जय जिजाऊ जय शिवराय’ असे लिहिले आहेत.