वाहतूक नियमांचा भंग केल्यास वाहनधारकांना १ सप्टेंबरपासून अधिक दंड भरावा लागत आहे. वाढते रस्ते अपघात रोखण्याचा उपाय म्हणून दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. यात कमीत कमी म्हणजे ५०० रुपये दंड हा रस्ते नियम तोडण्यासाठी असून जास्तीत जास्त म्हणजे २५ हजार रुपये दंड आणि तीन वर्षांचा तुरुंगवास हा अल्पवयीन मुला-मुलीने वाहन चालवून गुन्हा केल्यास मालक वा पालकाला भोगावा लागणार आहे. या नव्या कायद्याचा दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू याच्याशी कनेक्शन असल्याचं नेटकरी म्हणत आहेत.

आता अभिनेता महेश बाबूचा मोटार वाहन कायद्याशी काय संबंध, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर महेश बाबूचा ‘भारत अने नेनू’ हा तेलुगू चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित झाला होता. कोरटला शिवा दिग्दर्शित या चित्रपटात वडिलांच्या निधनानंतर महेश बाबू आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्याची जबाबदारी स्वीकारतो. मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्यात तो आमूलाग्र बदल घडवून आणतो आणि त्यापैकीच एक म्हणजे नवी वाहतूकदंड आकारणी. त्याच्या निर्णयाला सुरुवातीला फार विरोध होतो, मात्र नंतर जनतेकडून त्याचं कौतुक होतं.

महेश बाबूचे चाहते ट्विटरवर या चित्रपटाचे मीम्स शेअर करत नवीन मोटार वाहन कायदा ‘भारत अने नेनू’पासून प्रेरणा घेत लागू केल्याचा अंदाज व्यक्त करत आहेत.

‘भारत अने नेनू’ या चित्रपटात महेश बाबूसोबत कियारा अडवाणीने भूमिका साकारली होती. बॉक्स ऑफीसवर हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.

Story img Loader